मागासवर्गीयाने घेतलेल्या घरामुळे इतर घर विकत नसल्याने व घर खाली न करता कर्ज घेतल्याने केली जीतीवाचक शिवीगाळ
अहमदनगर (प्रतिनिधी)- तुम्ही घेतलेल्या घरामुळे इतर घर विकत नसल्याने व त्या घरावर कर्ज घेतल्याचा राग येऊन रस्त्यावर जातीवाचक शिवीगाळ करुन व गचांडी पकडून धमकाविल्याप्रकरणी दरेवाडी येथील बांधकाम व्यावसायिक तथा ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र भानुदास बेरड यांच्यावर भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनला अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 (ॲट्रॉसिटीचा) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दीपक गणेश कांबळे यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी दीपक गणेश कांबळे यांनी सन 2019 मध्ये बिल्डर मच्छिंद्र भानुदास बेरड यांच्याकडून रो बंगलो स्कीम मध्ये वडिलांच्या नावावर महागणेशा सोसायटीत रो बंगला संपूर्ण कागदपत्र व पैशाची पूर्तता करून विकत घेतला होता. संपूर्ण कुटुंबासह राहण्यास गेले असता, त्यांनी घरावर अशोक चक्र लावले होते. सहा महिन्यानंतर मच्छिंद्र बेरड याने तुमच्या घरावर लावलेले अशोक चक्र काढून टाका तुमच्या लोकांमुळे बाकीचे बंगले कुणीच विकत घेत नसल्याचे सांगून घर खाली करण्यास तगादा लावला होता. मात्र याप्रकरणी तक्रार केली नाही.
रविवारी 3 डिसेंबर रोजी दुपारी पत्नी बरोबर दरेवाडी फाटा येथे उभे असताना बेरड याने येऊन घरावर न विचारता कसे लोन केले? असे सांगून शिवीगाळ केली. त्याला कांबळे यांनी स्वत:च्या मालकीचा झालेल्या घरावर लोन घेतलेले आहे, तुमचा काही एक संबंध नसल्याचे सांगितले. यावर बेरड याने जातीवाचक शिवीगाळ करुन तुमच्यामुळे माझ्या घरांची विक्री होत नसल्याचा आरडाओरडा करून गचंडी धरून धमकाविल्याचे कांबळे यांनी फिर्यादीत म्हंटले आहे.