• Tue. Dec 30th, 2025

श्रीगोंदा पंचायत समितीतील महिला बचत गट अपहार प्रकरणी अखेर गुन्हा दाखल

ByMirror

Dec 23, 2025

अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या पाठपुराव्याला यश; अपहारित रक्कम निश्‍चित

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- श्रीगोंदा पंचायत समिती अंतर्गत महिला बचत गटांच्या माध्यमातून शासकीय निधीचे नियमबाह्य वितरण, आर्थिक अनियमितता व मोठ्या प्रमाणावर अपहार झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, चौकशीदरम्यान आढळून आलेली अपहारित रक्कम अंतिम करण्यात आली आहे. या प्रकरणी दोषी आढळलेल्या संबंधितांविरोधात बेलवंडी पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.


श्रीगोंदा पंचायत समितीच्या अखत्यारित महिला बचत गटांच्या नावाने मंजूर झालेला शासकीय निधी काही खाजगी एंटरप्रायझेसच्या नावाने बँक खात्यांमध्ये वळवून लाखो रुपयांचा अपहार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात पंचायत समिती श्रीगोंदा कार्यालयातील काही जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांचा थेट सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.


या गंभीर आर्थिक गैरव्यवहारास जबाबदार असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांवर शासकीय रकमेचा अपहार केल्याबद्दल फौजदारी गुन्हा दाखल करून तात्काळ बडतर्फ करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली होती. समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी या प्रकरणाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी 10 डिसेंबरपासून विभागीय आयुक्त, नाशिक यांच्या कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा दिला होता.


या आंदोलनाची गंभीर दखल घेत प्रशासनाने अखेर हालचाली सुरू केल्या. चौकशी पूर्ण करून अपहारित रक्कम निश्‍चित करण्यात आली असून, संबंधित दोषींविरोधात बेलवंडी पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती लेखी पत्राद्वारे श्रीगोंदा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी कळविली आहे. या कारवाईमुळे पंचायत समितीतील भ्रष्टाचार प्रकरणी प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले असून, भविष्यात दोषींवर आणखी कडक शासकीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *