आंबेडकर जयंतीनिमित्त ‘रिकॉन्शिओ शिक्षण’ लागू करण्यासाठीची हाक
अंधश्रद्धा, जाती हटावासाठी पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेचा पुढाकार.
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जातिव्यवस्था, अंधश्रद्धा, स्त्री दास्य व भोंदूगिरी ,मतदास्य यांचे समाजातून कायमस्वरूपी उच्चाटन करण्यासाठी शिक्षणपद्धतीत आमूलाग्र बदल करण्याची मागणी पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसद यांच्या वतीने करण्यात आली आहे. इयत्ता 4 थी ते 12 वीच्या शिक्षणात ‘रिकॉन्शिओ शासनाद्वारे अजनुकीय माहिती सुधारणा’ हा विषय अनिवार्य करण्यासाठी राष्ट्रव्यापी स्तरावर ही मागणी करण्यात आली.
भारताच्या सामाजिक परिवर्तनाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हुतात्मा स्मारक येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी “जात व धर्म हटाव, देश बचाव” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी ॲड. कारभारी गवळी, ॲड. अमित थोरात, ॲड. लक्ष्मण पोकळे, प्रकाश थोरात, अशोक सब्बन, प्रकाश गोसावी, प्रतीक म्हस्के, वीर बहादुर प्रजापती, पोपट भोसले, अशोक भोसले, रमा आढाव, आनंदा आढाव, संजय शेकडे, शाहीर कान्हू सुंबे, बाजीराव गव्हाणे, लखन साळवे आदी उपस्थित होते.
संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले की, जातिव्यवस्था ही सुमारे 2500 वर्षांपासून भारतीय समाजात खोलवर रुजलेली आहे. तिचे उच्चाटन करण्यासाठी केवळ कायदे पुरेसे नसून दीर्घकालीन, शास्त्रशुद्ध व सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक आहेत. इयत्ता 4 थी ते 12 वी हा विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाचा सुवर्णकाळ असून, या टप्प्यावर ‘रिकॉन्शिओ शिक्षण’ दिल्यास पुढील पिढीला जातिव्यवस्था व अंधश्रद्धेपासून मुक्त करता येऊ शकते, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
ॲड. कारभारी गवळी म्हणाले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला संविधान दिले आणि जाती निर्मूलनाचा स्पष्ट मार्ग दाखवला. मात्र संविधानाची अंमलबजावणी होऊनही जातिव्यवस्था, अंधश्रद्धा, भोंदूगिरी, दैववाद, स्त्रीदास्य आणि मतदास्य या सामाजिक व्याधी आजही समाजात जिवंत आहेत. याचे मूळ कारण म्हणजे माणसाच्या मेंदूत खोलवर रुजलेली अजनुकीय माहिती. कायदा माणसाचे वर्तन बदलू शकतो, परंतु मनातील संस्कार बदलण्यासाठी शिक्षणपद्धतीत बदल करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे ‘रिकॉन्शिओ शासन’ आणि समन्वित ज्ञान सिद्धांत यांचा आधार घेऊन शिक्षणात क्रांतिकारी बदल घडवणे गरजेचे आहे.
जातिव्यवस्था व अंधश्रद्धा या ‘केंद्राभिमुख भावना’ जसे की भय, कल्पनानिष्ठा, जातीय अहंकार आणि आंधळी आज्ञाधारकता यांमुळे टिकून आहेत. याउलट, ‘केंद्रापसारक भावना’ विवेक, वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवी प्रतिष्ठा आणि स्वतंत्र विचार यांचा विकास करणे हे शिक्षणाचे ध्येय असले पाहिजे. ‘समज, तपास आणि सुधारणा’ हे त्रिसूत्र शिक्षणाचे मूलतत्त्व असले पाहिजे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रकाश थोरात म्हणाले की, आज समाजात अजूनही जातीय भेदभाव आणि अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात दिसून येते. या समस्येवर केवळ कायद्याच्या माध्यमातून उपाय होणार नाही, तर शिक्षणातून मानसिकता बदलणे आवश्यक आहे. लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, समता आणि मानवी मूल्ये रुजवली गेली, तर भविष्यात समाज अधिक समतावादी व प्रगत होईल. ‘रिकॉन्शिओ शिक्षण’ ही संकल्पना या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असून शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
अशोक सब्बन म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या समतेच्या विचारांचा स्वीकार केल्याशिवाय समाजाचा खरा विकास होऊ शकत नाही. आजही अनेक ठिकाणी अंधश्रद्धा व भोंदूगिरीमुळे सामान्य माणूस दिशाभूल होत आहे. यावर प्रभावी उपाय म्हणजे शिक्षणातून विवेक निर्माण करणे. ‘रिकॉन्शिओ शिक्षण’ विद्यार्थ्यांमध्ये विचार करण्याची क्षमता वाढवेल आणि अंधानुकरणापासून दूर ठेवेल. त्यामुळे भविष्यात एक सुजाण, विवेकी आणि समताधिष्ठित समाज घडवणे शक्य होईल,” असे त्यांनी नमूद केले.
