• Thu. Mar 13th, 2025

माध्यमिक शिक्षक सोसायटी समोर विरोधी संचालक व सभासदांचे निदर्शने

ByMirror

May 23, 2023

पळकुट्या सत्ताधार्‍यांचा निषेध असो… च्या घोषणा

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीची वार्षिक सर्व साधारण सभा काही मिनिटातच सत्ताधारी संचालकांनी उधळून लावल्याच्या निषेधार्थ प्रतिसभा घेऊन परिवर्तन मंडळाच्या विरोधी संचालक व सभासदांनी माध्यमिक शिक्षक सोसायटी बाहेर निदर्शने केली.


पळकुट्या सत्ताधार्‍यांचा निषेध असो…, संस्थेच्या राजकारणासाठी शिक्षकांना बदनाम करणार्‍या सत्ताधार्‍यांचा धिक्कार असो… च्या घोषणा देत विरोधी संचालक व सभासदांनी जोरदार निदर्शने केली. या आंदोलनात विरोधी संचालक आप्पासाहेब शिंदे, बाबासाहेब बोडखे, महेंद्र हिंगे, वसंत खेडकर, बाळासाहेब राजळे, सुनिल दानवे, सभासद समाधान आराख, संतोष अडकित्ते, सुदाम जाधव, बाळासाहेब तांबे, बाळासाहेब पिल्ले, अजमोद्दीन पठाण, अर्जुन भुजबळ, संतोष ठाणगे, भगवान राऊत, मंगेश काळे, किशोर मुथा, बबन शिंदे, शिवाजी लवांडे, दिलीप दुर्गेश, बाळासाहेब खिलारी, आत्माराम दहिफळे, पांडुरंग धोत्रे, शिवाजी रोकडे, छगन पानसरे आदी सहभागी झाले होते.


मंगळवारी (दि.23 मे) जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीची सर्वसाधारण सभा अशोक ठुबे यांच्या अध्यक्षतेखाली नंदनवन लॉन येथे पार पडली. सेवानिवृत्त झालेले सत्ताधारी मंडाळाचे नेते तथा तज्ञ संचालक प्रा. भाऊसाहेब कचरे यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेत त्यांना बोलण्यात विरोधी संचालकांनी विरोध केला. यावरून सत्ताधारी-विरोधी मंडळाचे संचालक व कार्यकर्ते यांच्यात हमरी-तुमरी व घोषणाबाजी होऊन प्रचंड गदारोळ झाला. अवघ्या पाच मिनिटातच सभेच्या कामकाजाचा गाशा सत्ताधारी संचालकांनी गुंडाळला. सभा संपली तरी सत्ताधारी व विरोधकांनी स्वतंत्र प्रतिसभा घेऊन घोषणाबाजी केली. यानंतर सर्व विरोधी संचालक व सभासदांनी सोसायटी समोर एकत्र येऊन निदर्शने केली.


आप्पासाहेब शिंदे म्हणाले की, विरोधकांच्या प्रश्‍नांना उत्तरे न देता, सत्ताधारी सभा सोडून पळाले. इतिवृत्तात काही मुद्दे जाणिवपूर्वक टाळण्यात आले. सभा चालवण्याचा अधिकार निवृत संचालकांना नाही. मात्र तरी देखील संस्थेत ढवळाढवळ करुन सत्ताधार्‍यांच्या चूकांना पांघरुन घालण्याचे काम त्या तज्ञ संचालकाकडून होत असल्याचे त्यांनी सांगितले.


बाबासाहेब बोडखे म्हणाले की, सत्ताधार्‍यांनी जाणीवपूर्वक सभा उधळून लावली. सभेपुढील विषयाचे वाचन देखील करण्यात आलेले नाही. गोंधळानंतर लगेच वंदे मातरम… घेऊन सभा संपवली. सेवानिवृत्त झालेल्या व्यक्तीचे सोसायटीचे सभासदत्व रद्द होते. तरी देखील तज्ञ संचालक म्हणून सेवानिवृत्त व्यक्तीला सभा चालविण्याचा अधिकार नाही. तर डाटा सेंटर भाडेतत्त्वावर देण्याचा विषय मंजूर करण्यासाठी सभा होऊ दिलेली नाही. सभेसाठी आलेल्या सभासदांसाठी पाणी-जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी केला.


सुनिल दानवे म्हणाले की, सभासदांच्या प्रश्‍नांना सत्ताधार्‍यांना उत्तरे देता येत नसतील तर त्यांनी राजीनामे द्यावे. माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या इतिहासात प्रथमच सत्ताधार्‍यांनी सभा गुंडाळण्याची नामुष्की त्यांच्या चूकांमुळे ओढवली आहे. सभासद हिताचे निर्णय न घेता हुकूमशाही पध्दतीने कारभार सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *