बुथ सेक्टर बांधणीला सुरुवात
धर्मा-धर्मात समाजाला विभागून सत्ता टिकविण्याचे काम सुरु -उमाशंकर यादव
अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक एकतेचा संदेश घेऊन लोकशाही व धर्मांध शक्ती विरोधात प्रचार-प्रसार करुन बहुजन समाजाला संघटित करण्यासाठी काढण्यात आलेल्या बहुजन समाज पार्टीची गाव चलो अभियानाची बैठक कोपरगाव येथे पार पडली. तर बसपाच्या बुथ सेक्टर बांधणीला सुरुवात करण्यात आली.
या बैठकीसाठी बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव, माजी जिल्हाध्यक्ष तथा शहराध्यक्ष मेजर राजू शिंदे, जिल्हा सचिव माधवराव त्रिभुवन, कोपरगाव शहराध्यक्ष महेबूब पठाण, मनोज त्रिभुवन, कोपरगाव विधानसभा महासचिव सुनील बाहुळकर, सलीम शेख, कोमल खडताळे, कमल पवार, झुलेखा पठाण, नजमा पठाण, मुन्नी यादव, राजश्री त्रिभुवन, सुलताना शेख, मनोज साबळे, सागर पवार आदी उपस्थित होते.

प्रारंभी महापुरुषांना अभिवादन करून बैठकीची सुरुवात करण्यात आली. सध्याच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. मेजर राजू शिंदे यांनी शहरात सुरु झालेले धार्मिकतेचे वाद आता गावा-गावात पसरविण्यात आले आहे. नागरिकांमध्ये भिती निर्माण करुन संरक्षण देण्याच्या नावाखाली सत्ताधारी पक्ष पुन्हा सत्ता हस्तगत करण्याच्या तयारीला लागले असल्याचे स्पष्ट केले.
जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव म्हणाले की, धर्मा-धर्मात समाजाला विभागून सत्ता टिकविण्याचे काम केले जात आहे. जनतेच्या प्रश्नांना बगल देण्यासाठी धार्मिक दंगलीला प्रोत्साहन देण्याचे राजकारण सुरु आहे. देशभक्त नागरिकांनी देखील धर्मांधांना धडा शिकविण्यासाठी एकवटण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. कोपरगाव शहराध्यक्ष महेबूब पठाण यांनी शहरात बुथ सेक्टर कार्यान्वीत करण्यात आले असून, कार्यकर्त्यांसह सर्व बहुजन समाजाला जोडण्याचे काम केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.