शिबिराचा गरजूंना लाभ घेण्याचे व युवकांना उत्स्फूर्तपणे रक्तदान करण्याचे आवाहन
अहमदनगर (प्रतिनिधी)- छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेस, श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती व नगर डॉक्टर्स सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि.14 मे) मोफत सर्व रोग निदान शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर यांनी दिली.
आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक उपक्रमाने या जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी सकाळी गुलमोहर रोड, आम्रपाली गार्डन शेजारील कमलाबाई नवले हॉल येथे मोफत सर्व रोग निदान शिबिर होणार आहे. यामध्ये तज्ञ डॉक्टर कृत्रीम दंतरोपण, दंत विकार तपासणी, स्त्रीरोग तपासणी, होमिओपॅथी तपासणी, जनरल फिजिशियन, आहार मार्गदर्शन व सर्व रक्त तपासण्या करणार आहेत. या शिबिरासाठी डॉ. सुदर्शन गोरे, डॉ. शिवराज गुंजाळ, डॉ. महेश कोकाटे, डॉ. हेमंत सोले, डॉ. आदिती पानसंबळ, लक्ष्मीकांत पारगावकर यांचे सहकार्य लाभत आहे.
तसेच माळीवाडा वेस येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी न्यू अर्पण व्हॉलंटरी ब्लड सेंटरचे सहकार्य लाभत आहे. या मोफत सर्व रोग निदान शिबिराचा सर्व गरजूंना लाभ घेण्याचे व युवकांना उत्स्फूर्तपणे रक्तदान करण्याचे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.