मोची गल्ली व्यापारी असोसिएशनचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना निवेदन
तणाव निर्माण करणार्यांविरोधात सर्व व्यापारी एकवटले
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या बाजारपेठेतील वातावरण दुषित करुन तणाव निर्माण करणार्या समाजकंटकांवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन मोची गल्ली व्यापारी असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना गुरुवारी (दि.17 मार्च) संध्याकाळी देण्यात आले. निवेदनावर मन्सूर शेख, पवन धोका, किशोर हंसिजा, सलिम पिरागी, संतोष मुथा, बाळू कांबळे, राजू साखला, ईश्वर पवार, किरण सोनाग्रा, नरेंद्र भांगडिया, योगेश बिंद्रे, अकलाख शेख, शरद गोयल, शब्बीर शेख, योगेश गोसावी, इक्राम तांबटकर, मयुर कोळपकर, निरज काबरा, हमजा शौकत अली, संतोष गोयल आदी मोची गल्ली व कापड बाजार मधील व्यापार्यांच्या स्वाक्षर्या आहेत.
शहरातील घास गल्ली येथे दुकानदार हातगाडी विक्रेत्यांच्या किरकोळ भांडणाला राजकीय वळण मिळाले असून, कापड बाजारपेठ व मोची गल्लीत जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. बाजारपेठेतील व्यापारी सर्व जाती-धर्माचे असून, त्यांच्याकडे येणारा ग्राहक वर्ग देखील सर्व जाती धर्माचा आहे.सर्व व्यापारी मोची गल्ली व्यापारी असोसिएशनचे सदस्य असून, ही संघटना सन 2016 पासून नोंदणीकृत व अधिकृत आहे. संघटनेच्या माध्यमातून वेळोवेळी जातीय सलोखा व व्यापार्यांच्या हक्कासाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला जातो. तर मोची गल्ली व्यापारी असोसिएशनतर्फे शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून विविध प्रकारचे उपक्रम आयोजन केले जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
कापड बाजार व मोची गल्लीतील व्यापारी गुण्यागोविंदाने आपला व्यवसाय करीत आहे. बाजारपेठेत राजकारण होत असून, बाजारपेठेचे वातावरण दुषित झाले आहे. काही संघटना व्यापार्यांवर जीवघेणे हल्ले होत असल्याचे खोटे चित्र निर्माण करीत असून, हल्लेखोरांना कठोर शासन करण्यास पोलीस व न्याय यंत्रणा सक्षम आहे. ही खोटी माहिती पसरवून समाजात दुही व शहराचे वातावरण बिघडविण्याचे काम केले जात असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
कोरोनाच्या टाळेबंदीनंतर बाजारपेठेची अर्थव्यवस्था रुळावर येत असून, अशा घटनांमुळे सर्वसामान्य व्यापार्यांना फटका बसत आहे. चिथावणीखोर पत्रक काढणारे उपद्रवी आहे की, बाजारपेठेत शांततेचे आवाहन करणारी मोची गल्ली व्यापारी असोसिएशन अधिकृत संघटना उपद्रवी? हा प्रश्न उपस्थित करुन याची शहानिशा करण्याचे म्हंटले आहे. व्यापारी हा बाजारपेठ सोडण्यासाठी नव्हे, तर व्यापार करण्यासाठी आलेला आहे. मात्र अशा समाजकंटकांचे राजकारण व जातीयवादी प्रवृत्तीतून नक्कीच व्यापारी बाजारपेठ सोडण्याचा विचार करेल यात तिळमात्र शंका नाही. याप्रकरणी सखोल चौकशी करुन बाजारपेठेत तणाव निर्माण करणारे, प्रसार माध्यमांमधून चुकीचे पत्र प्रसारित करणार्यांवर कारवाई करण्याची मागणी मोची गल्ली व्यापारी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.