डोंगरे बहुद्देशीय संस्था आणि श्री नवनाथ युवा मंडळाचा छत्रपती संभाजी महाराज जयंतीचा उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- नेहरु युवा केंद्र, जिल्हा क्रीडा कार्यालय संलग्न स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने निमगाव वाघा (ता.नगर) येथे छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त व्यसनमुक्तीवर जिल्हास्तरीय पोस्टर व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे यांनी दिली.
युवकांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढत असताना छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचे आदर्श व विचार युवकांमध्ये रुजवून त्यांना व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गुटखा, दारु, धुम्रपान, जुगार याचे दुष्परिणाम दर्शविणारे हाताने काढलेले पोस्टर स्पर्धेसाठी स्विकारले जाणार आहेत. रविवार दि.14 मे रोजी नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे होणार्या जयंती कार्यक्रमात पोस्टरचे प्रदर्शन लावले जाणार आहे.
तर वक्तृत्व स्पर्धेसाठी व्यसन शाप की हतबलता, 21 व्या शतकातील युवकांची व्यसनाने झालेली दशा, व्यसन एक विश्वव्यापी समस्या, स्वराज्य रक्षक संभाजी महाराज व शूरवीर संभाजी महाराज हे विषय देण्यात आले आहेत. स्पर्धकांना या विषयावर आपले मनोगत व्यक्त करायचे आहे. सदर स्पर्धा शालेय विद्यार्थी (इयत्ता 8 वी ते 10 वी) लहान गट तर महाविद्यालयीन वरिष्ठ अशा दोन गटात होणार आहे. स्पर्धेतील प्रत्येक गटातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्राचे बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांना नेहरु युवा केंद्राच्या वतीने प्रमाणपत्राचे वितरण केले जाणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन युवा मंडळाचे अध्यक्ष पै.संदिप डोंगरे यांनी केले.
व्यसनमुक्तीवर आधारित पोस्टर्स शनिवार दि.13 मे पर्यंन्त निमगाव वाघा येथील स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेच्या कार्यालयात पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी नेहरु युवा केंद्राचे उपनिदेशक शिवाजी खरात व जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले यांचे मार्गदर्शन लाभत आहे. अधिक माहितीसाठी पै.नाना डोंगरे मो.नं. 9226735346 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.