भिंगारमध्ये नागरिक व कार्यकर्त्यांना पेढे वाटून जल्लोष
अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय बदलल्याने राष्ट्रीवादीत नवचैतन्य -संजय सपकाळ
अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय मागे घेतल्याचा भिंगार राष्ट्रवादीच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. भिंगार येथील विविध भागात नागरिक व कार्यकर्त्यांना पेढे वाटून या निर्णयाचे स्वागत करुन शरद पवार जिंदाबादच्या घोषणा देऊन एकच जल्लोष केला.

भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ यांनी सर्वांना पेढे भरवले. यावेळी नंदकुमार झंवर, मनोहर दरवडे, सर्वेश सपकाळ, मेजर दिलीप ठोकळ, तुषार धाडगे, दिपक धाडगे, शशांक अंबावडे, जालिंदर बोरुडे, शशिकांत बोरुडे, सलाबत खान, अजेश पुरी, शिवाजी लवांडे, नारायण भुजबळ, दळवी मेजर, दिपक बडदे, सदाशिव मांढरे, भाऊसाहेब गुंजाळ, माधवराव गायकवाड, एकनाथ जगताप, शेषराव पालवे, सुरेश कानडे, अशोक दळवी, सुभाष गोंधळे, विलास तोतरे, दिनकर धाडगे, राजेंद्र झोडगे, जालिंदर अळकुटे, सुरेश गडाख, दिपक घोडके, सिताराम परदेशी, रामनाथ गर्जे, भिमराव फुंदे आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 2 मे रोजी राष्ट्रीय अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर राज्यातील राजकारणात विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ उडाली होती. दोन दिवसांच्या घडामोडी अखेर शुक्रवारी (दि. 5 मे) शरद पवार यांनी मुंबई येथील यशवंत चव्हाण सेंटर येथे पत्रकार परिषद घेत राष्ट्रीय अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय मागे घेतल्याचे स्पष्ट केल्याने भिंगारसह ठिकठिकाणी जल्लोष करण्यात आला.

संजय सपकाळ म्हणाले की, देश, राज्य आणि पक्षाला शरद पवारांची गरज आहे. महाराष्ट्राला पुरोगामी विचाराने त्यांनी नेहमीच दिशा देण्याचे काम केले. तर महाराष्ट्रासह देशाच्या विकासासाठी त्यांनी भरीव योगदान दिले आहे. त्यांनी अचानकपणे राष्ट्रीय अध्यक्षपद सोडण्याच्या निर्णयाने राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते व पदाधिकारींचे मन हेलावले. मात्र त्यांनी हा निर्णय बदलल्याने राष्ट्रीवादीत नवचैतन्य निर्माण झाले आहे. देश व राज्य एका वेगळ्या वाटेवरुन जात असताना सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.