राष्ट्रवादीचे युवक शहर जिल्हाध्यक्षांचा आमदार राणे यांना टोला
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराचे आमदार संग्राम जगताप विकासाच्या मुद्दयावर निवडून आलेले आहेत. द्वेषाचे राजकारण व गुंडगिरी करुन निवडून आलेले नाहीत. स्वाभिमान विलीन केलेल्या नेत्यांनी नजर मिळविण्याची भाषा करु नये, संस्कार व वैचारिक पात्रता नसलेल्या व्यक्तींबरोबर नजर मिळवण्याची गरजच नसल्याचा टोला राष्ट्रवादीचे युवक शहर जिल्हाध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर यांनी आमदार नितेश राणे यांना लगावला.
काही दिवसांपूर्वी अतिक्रमणाच्या वादातून व्यापार्याला मारहाण झाली होती. या व्यापार्याची भेट घेण्यासाठी राणे नुकतेच शहरात येऊन आमदार जगताप यांच्यावर केलेल्या टिकेला उत्तर देताना इंजि. क्षीरसागर यांनी भावना व्यक्त केली.
इंजि. क्षीरसागर पुढे म्हणाले की, आमदार जगताप यांनी सर्वसामान्यांच्या मनात घर केल्याने विकासाच्या मुद्दयावर निवडून आलेले आहेत. स्वत:च्या मतदार संघ सोडून, इतरांच्या मतदार संघात लुडबुड करण्यासाठी येतात. काय त्यांची भाषा, काय त्यांचे संस्कार व काय ते आचार यामुळेच संस्कार व बुध्दी नसलेल्या व्यक्ती बरोबर काय नजर मिळवायची. शहरातील राजकारणावर बोलण्याचा राणे यांना नैतिक अधिकार नाही. शहरात ज्या विषयासाठी आले, त्याचा अभ्यास न करता युवकांचे माथी भडकविण्यासाठी द्वेषाचे राजकारण करण्याची गरज नाही. यापुढे विचार करुन बोलावे, अन्यथा जशास तसे उत्तर राष्ट्रवादीच्या वतीने देण्यात येईल. तर स्वत:चा मतदार संघ शाबूत ठेवा, मग इतर शहरात येऊन लोकप्रतिनिधींवर भाष्य करा.