सामाजिक कार्यकर्ते भिंगारदिवे यांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
बुधवारी तोफखाना पोलीस स्टेशन समोर उपोषण
अहमदनगर (प्रतिनिधी)- जागेच्या व्यवहारात गुंतवलेला काळा पैसा इतरत्र वळविणारे शहरातील तो बांधकाम व्यावसायिक, शिवसेनेची महिला पदाधिकारी व त्या युवकावर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी चौकशी करुन गुन्हा दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते पवन भिंगारदिवे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तर बुधवारी (दि. 19 एप्रिल) सदर मागणीसाठी तोफखाना पोलीस स्टेशन समोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
पवन भिंगारदिवे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सावेडी येथील श्रीराम चौक समर्थ नगर येथील कलेक्टर एनए प्लॉटचे साठेखत महिला शिवसेनेची महिला पदाधिकारी व एका युवा कार्यकर्त्याच्या नावे बांधकाम व्यावसायिकाने करुन दिले होते. नोटरी, साठेखत करून दिल्यानंतर त्या महिला पदाधिकारीने पोलीस बंदोबस्तामध्ये त्या प्लॉटची मोजणी केली. मोजणी करत असताना तेथे वाद निर्माण झाल्याने अॅट्रॉसिटी सारखे गंभीर गुन्हे दाखल झाले. अशा प्रकारे एक दोन गुन्हे अजून दाखल झाले असून, हे प्रकरण सुरु असताना माझ्यावर देखील जीव घेणा हल्ला झाला. हा मनी लॉन्ड्रिंगचा प्रकार असून हे उघडकीस आणण्यासाठी शेवटपर्यंत पाठपुरावा सुरू राहणार आहे. याबाबत पुराव्यासह उपोषणास बसणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
त्यांचे पितळ उघड पडल्यामुळे सदरचा व्यवहार रद्द झाला आहे. हा काळा पैसा दुसरीकडे वळविण्यात आला असून, याप्रकरणी तात्काळ चौकशी करून संबंधितांवर लॉन्ड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी भिंगारदिवे यांनी केली आहे.