शिक्षकांनी बँकेचे व सभासदांचे हित जोपासून कामकाज करताना समाजापुढे चांगला आदर्श ठेवावा -आ. संग्राम जगताप
अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षक हा समाजातील महत्त्वाचा घटक असून, त्यांच्याकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टीकोन देखील वेगळा आहे. विद्या दानाचे पवित्र कार्य करताना शिक्षकांनी बँक किंवा पतंस्थेतील कामकाज पाहताना संस्थेचे व सभासदांचे हित जोपासून समाजासमोर चांगला आदर्श समोर ठेवण्याचे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
हिंद सेवा मंडळ सेवकांची सहकारी पतपेढीच्या पंचवार्षिक निवडणुकीत निवडून आलेल्या नूतन संचालकांचा माध्यमिक शिक्षक सोसायटीचे विरोधी संचालक व परिवर्तन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार जगताप बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, सभागृह नेते विनीत पाऊलबुद्धे, नगरसेवक बाळासाहेब पवार, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक बाबासाहेब बोडखे,आप्पासाहेब शिंदे, सुनील दानवे, क्रांती मुंदनकर, सुखदेव नागरे, संजय शेकडे, विनोद जोशी, प्रवीण लोखंडे, नंदे सर, गोर्डे, संजय शिरसाठ, शिवप्रसाद शिंदे, देविदास पालवे, रमाकांत दरेकर, नंदकुमार शितोळे, भाऊसाहेब जीवडे, शिवाजी नरसाळे, प्रसाद काळे, महेश महांडुळे आदी शिक्षक उपस्थित होते.
संचालकपदी बहुमताने निवडून आल्याबद्दल दीपक आरडे, अमोल कदम, मिलिंद देशपांडे, राहुल गागरे, नितीन केणे, दीपक शिरसाठ, वैशाली दारवेकर यांचा आमदार जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ संचालकांनी निवडणुकीतील अनुभव विशद करुन पतपेढीच्या कामाची माहिती दिली.
आप्पासाहेब शिंदे म्हणाले की, माध्यमिक शिक्षक सोसायटीत सत्ता नसली तरी सत्ताधारींवर अंकुश ठेवण्याचे काम परिवर्तन मंडळाचे विरोधी संचालक करत आहे. सभासद हितासाठी सर्व विरोधी संचालक प्रयत्नशील असल्याचे सांगून, इतर अनावश्यक खर्चात कपात करून संस्था चांगल्या पद्धतीने चालवण्याचा अजेंडा घेण्यात आला आहे. संस्था चालवताना सभासद हित हे केंद्रबिंदू ठेवून चालविण्याचे त्यांनी आवाहन केले. तर माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या कामकाजाची माहिती दिली. संचालक
बाबासाहेब बोडखे म्हणाले की, संस्था चालविताना सर्व संचालकांचे संघटन आवश्यक आहे. विचारांची देवाण-घेवाण सत्ताधारी व विरोधकांमध्ये होणे देखील गरजेचे आहे. सर्वांचे निर्णय बरोबर असतील असे नाही, राजकारण हे तात्विक असावे. माध्यमिक शिक्षक सोसायटीत सत्ताधारी मंडळाचे एखादे काम चुकीच्या पध्दतीने होताना दिसले तर लोकशाही मार्गाने आंम्ही विरोध तर करतोच, परंतु जर एखादे काम संस्थेच्या व सभासदांच्या हिताचे असेल तर एकमताने पाठिंबा सुद्धा देत असतो. चुकीचा कारभार उघडकीस आणण्याचा प्रयत्न केल्यास सत्ताधार्यांकडून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्नही केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रा. माणिक विधाते यांनी शिक्षण क्षेत्र समाजातील सर्वात पवित्र क्षेत्र आहे. त्याचे पावित्र्य जपण्याचे काम शिक्षकांनी केलेच पाहिजे. प्रामाणिकपणे केलेल्या कामाची सभासद दखल घेतात. राजकारणापेक्षा आदर्श निर्माण करण्याचे त्यांनी सांगितले. या सत्कार समारंभासाठी शिक्षक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नंदकुमार शितोळे यांनी आभार मानले.