बाबासाहेबांच्या राज्य घटनेने समाजातील उपेक्षितांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला -एन.एम. पवळे
अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती जिल्हा परिषदेत साजरी करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या आवारात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
या अभिवादन कार्यक्रमासाठी कास्ट्राईबचे राज्याध्यक्ष एन.एम. पवळे, राज्य उपाध्यक्ष वसंत थोरात, जिल्हाध्यक्ष के.के. जाधव, महासचिव सुहास धीवर, जिल्हा उपाध्यक्ष दत्ता रणसिंग, महिला जिल्हाध्यक्षा नंदाताई भिंगारदिवे, पोपट खंडागळे, सतीश केळगंद्रे, श्याम गोडळकर, विजय तरोटे, बाबासाहेब पारधे, बुध्दानंद धांडोरे आदी उपस्थित होते.
राज्याध्यक्ष एन.एम. पवळे म्हणाले की, डॉ. बाबासाहेबांच्या विचाराचा जागर होवून, सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी त्यांच्या विचारांची खर्या अर्थाने गरज आहे. जनसामान्यांच्या कल्याणासाठी राज्यघटना अस्तित्वात आली. बाबासाहेबांच्या राज्य घटनेने समाजातील उपेक्षितांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्य उपाध्यक्ष वसंत थोरात म्हणाले की, दीन, दलित व दुर्बल घटकातील लोकांसाठी डॉ. बाबासाहेबांनी कार्य केले. त्यांच्या अथक प्रयत्नाने स्वातंत्र्यता, समता व बंधुत्वाची मुल्य रुजविणारी घटना असतित्वात आली असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाध्यक्ष के.के. जाधव यांनी प्रचंड संघर्षशील परिस्थितीतही बाबासाहेबांनी समाजव्यवस्थे विरोधात लढा देऊन दीन-दुबळ्यांना जगण्याचा हक्क मिळवून दिला. पिढ्यानपिढ्या गुलामगिरीत जोखडलेल्या समाजाचे नेतृत्व करुन त्यांना गुलामगिरीतून मुक्त केले व माणुस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून दिल्याचे त्यांनी सांगितले.