• Fri. Mar 14th, 2025

पाण्यासाठी महिलांनी वॉलमनच्या हातातील चाव्या घेऊन केले आंदोलन

ByMirror

Mar 30, 2023

केडगाव, कायनेटीक चौक परिसरातील पाणी प्रश्‍न सुटेना

संतप्त महिलांचा आक्रमक पवित्रा

अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव, कायनेटीक चौक परिसरातील नागरिकांचा पाणी प्रश्‍न गंभीर बनला असताना, नळाद्वारे पाणी येत नसल्याने महिलांनी वॉलमनच्या हातातील वॉलच्या चाव्या घेऊन आंदोलन केले. यावेळी महिलांनी वॉलमन यांना चांगलेच धारेवर धरले. तातडीने पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी करुन पाण्याची गंभीर परिस्थिती पाहण्यासाठी पाणी पुरवठा विभागाचे संबंधित अधिकारी यांना बोलविण्याचा आग्रह धरला होता.


कायनेटीक चौक येथे झालेल्या या आंदोलनात परिसरातील महिला सहभागी झाल्या होत्या. संपूर्ण शहर व केडगावच्या इतर भागाला पाणी पुरवठा होत असताना प्रभाग क्रमांक 17 मधील विविध भागात गेल्या सहा महिन्यापासून पाणीपुरवठा होत नसल्याने महिला चांगल्याच संतप्त झाल्या होत्या.

मागील आठवड्यातच या भागातील पाणी प्रश्‍नासाठी महापालिकेत माठ फोडो आंदोलन करुन आयुक्तांना घेराव घालण्यात आला होता. आयुक्तांनी तात्पुरती वाढीव टँकरची व्यवस्था करुन, पाणी प्रश्‍न सोडविण्यासाठी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांना सूचना केलेल्या आहेत. मात्र या भागातील पाणी प्रश्‍न बिकट बनत असताना महिलांनी रस्त्यावर येऊन आक्रमकपणे आंदोलन केले.


नगरसेविका लताताई शेळके व सुरज शेळके यांनी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांना फोन करुन सदरची परिस्थिती सांगितली. तातडीने टँकर पाठविण्याचे आश्‍वासन मिळाल्याने महिलांनी आपले आंदोलन मागे घेऊन वॉलच्या चाव्या वॉलमनकडे परत केल्या. सदर परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास कायनेटिक चौकात रास्ता रोको करण्याचा इशारा देखील नागरिकांच्या वतीने देण्यात आलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *