प्रयासच्या अध्यक्षपदी मुंदडा तर दादी-नानी ग्रुपच्या अध्यक्षपदी घैसास यांची सर्वानुमते निवड
अहमदनगर (प्रतिनिधी)- स्पर्धामय युगात घटस्फोटाचे प्रमाण वाढत असून, ही चिंताजनक बाब आहे. छोट्या-छोट्या गैरसमजुतीमुळे टोकाचे पाऊल उचलले जात असून, संसार हा दोघांनी एकमेकांना सावरुन पुढे जायचे असते. एकाने पसरवले, तर दुसर्याने आवरायचं असते. मात्र युवा पिढी विवाह बंधनात अडकतांना हाऊस मॅनेजमेंटचा विचार करत नाही. घर दोघांचे असते त्यामुळे दोघांनी ते सावरायचे हा विचार मागे पडत चालला आहे. विवाह संस्कार समजून घेऊन विवाह बंधन केल्यास निश्चितपणे सुखी संसार थाटला जाणार असल्याचे प्रतिपादन मॅरेज कौन्सिलर वैशाली मुनोत यांनी केले.
प्रयास ग्रुप व दादी नानी ग्रुपच्या वतीने विवाह संस्कार या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुनोत बोलत होत्या. प्रयास व दादी-नानी ग्रुपची नुतन कार्यकारणी जाहीर करुन पदाधिकार्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. प्रास्ताविकात अलकाताई मुंदडा यांनी सर्व महिलांचे जीवन आनंदी करण्याबरोबर त्यांना ज्ञानसंपन्न करण्यासाठी विविध उपक्रमाचे आयोजन केले जातात. महिलांचा सर्वच क्षेत्रात विकास होऊन त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी ग्रुप प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रयास ग्रूपच्या अध्यक्षपदी अलकाताई मुंदडा, उपाध्यक्षपदी शारदा होशिंग, सचिवपदी ज्योती कानडे यांची तर दादी-नानी ग्रुपच्या अध्यक्षपदी प्रविणाताई घैसास, उपाध्यक्षपदी सविता गांधी, सचिवपदी शोभा पोखरणा यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. नुतन पदाधिकार्यांचा सत्कार पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत रोप देऊन करण्यात आला. यावेळी महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक व बौध्दिक खेळाच्या स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये कल्पना कटारिया, भगवती चंदे, मेघना मुनोत, संगीता गांधी, उज्वला मालू, रेखा फिरोदिया, वैशाली आपटे, सरस पितळे आदींनी बक्षिसे पटकावली. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या महिलांना बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमास शशिकला झरेकर, उषा गुगळे, चंद्रकला सुरपूरिया, सुजाता पूजारी आदी ग्रुपच्या सर्व महिला सदस्या उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपा कर्नावट यांनी केले. आभार ज्योती कानडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दीपा राछ, अलका कालानी, स्वाती नागोरी यांनी विशेष परिश्रम घेतले.