• Sun. Jun 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

तक्षिला स्कूलमध्ये रंगल्या आंतरशालेय विविध स्पर्धा

ByMirror

Jan 24, 2023

रंग दे बसंतीच्या उत्साहपूर्ण कार्यक्रमात विद्यार्थ्यांची धमाल

अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील तक्षिला स्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या रंग दे बसंती उपक्रमातंर्गत आंतरशालेय विविध स्पर्धा उत्साहात पार पडल्या. यावेळी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे बहारदार सादरीकरण करुन विविध स्पर्धेत आपल्या कौशल्याची चुणूक दाखवली. या स्पर्धेत शहरातील 16 शाळांचे सुमारे 450 विद्यार्थी सहभागी झाले होते.


विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव देण्यासाठी व इतर शाळेतील विद्यार्थ्यांना एकत्र आणून समता, बंधूभाव वाढीस लागण्यासाठी दरवर्षी तक्षिला (सीबीएससी) स्कूल या उपक्रमाचे आयोजन करत असते. या कार्यक्रमाचे उद्घाटन तक्षिला स्कूलच्या प्राचार्या जयश्री मेहेत्रे यांच्या हस्ते झाले. यावेळी शालेय शिक्षक, परीक्षक व स्पर्धेत सहभागी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


प्राचार्या जयश्री मेहेत्रे म्हणाल्या की, विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहे. सक्षम पिढी घडविण्यासाठी त्यांना विविध स्पर्धेच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळाल्यास त्यांचे उज्वल भवितव्य घडणार आहे. सर्व जाती, धर्म व पंथाच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीयत्वाच्या छत्राखाली एकत्र आणून त्यांच्यातील कौशल्य विकसित केल्यास देशाचा विकास साधला जाणार आहे. शिक्षणासह त्यांच्यात संस्कार घडविण्याचे काम देखील शिक्षक वर्ग करत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या स्पर्धेत सहभागी झालेल्या इतर शाळेतील शिक्षकांनी मनोगत व्यक्त करून, या उपक्रमाचे कौतुक केले.


या उपक्रमांतर्गत विविध प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये समूहनृत्य, कथाकथन, फॅन्सी ड्रेस, जनरल नॉलेज, मोनो अ‍ॅक्ट, रेडिओ जॉकी, नुक्कड नाटक, समूहगीत, रोल प्ले, टाईल पेंटिग, चित्रकला आदी स्पर्धा रंगल्या होत्या. अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या स्पर्धेचा विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला.


या स्पर्धेचे परीक्षण स्नेहा कासवा, भावना शिंगवी, मेरु कर्नावट, राधिका मुंडलिक, साक्षी बिहाणी, वर्षा शेकटकर, आर.जे. प्रसन्ना, वर्षा पंडित, भाव्या माखीजा, शशिकला बिहाणी, गणेश लिमकर, नंदनी नावंदर, संजय लोळगे, कल्पना गांधी, आशिष टट्टू, वंशिता नवलानी यांनी केले. प्राचार्या मेहेत्रे यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शालेय समन्वयक, इव्हेंट इनचार्ज, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *