वापरा अभावी पडून असलेली इमारत इतर सरकारी कार्यालयांसाठी देण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील जुने जिल्हाधिकारी कार्यालयाची चांगल्या स्थितीमधील इमारत वापरा अभावी पडून आहे. ही इमारत इतर शासकीय, निमशासकीय कार्यालयांना उपलब्ध करुन देण्याच्या मागणीसाठी पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीने होळीच्या दिवशी 17 मार्च रोजी पालकमंत्री व प्रशासनाच्या नावाने शिमगा (बोंबा मारुन) करुन सत्यबोधी सुर्यनामा आंदोलन केले जाणार असल्याची माहिती अॅड. कारभारी गवळी यांनी दिली.
अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जिल्हा प्रशासनाकडे उन्नत शिवचेतना नसल्यामुळे जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कोट्यावधी रुपयांच्या चांगल्या स्थितीतील इमारती वापरा अभावी पडून आहेत. जुने जिल्हाधिकारी कार्यालय मोकाट श्वानांसाठी झोपण्याचे ठिकाण झाले आहे. शहरात राज्य सरकारची विविध कार्यालय भाड्याने खासगी इमारतीतून काम करत आहे. त्यामुळे दर महिन्याला लाखो रुपये खर्च सरकारला येत आहे. दोन महिन्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद रोडवरील नव्या इमारतीत स्थलांतरित करण्यात आले. परंतु पालकमंत्री व जिल्हा प्रशासनाने जुने जिल्हाधिकारी इमारत इतर सरकारी कार्यालयांना दिलेले नाही. जुने जिल्हाधिकारी कार्यालय जवळील जागांचे व्यवस्थापन करून त्या इतर कार्यालयांसाठी त्वरित देण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांत देशातील शासन-प्रशासनामध्ये उन्नत शिवचेतना आणि माहिती गंगेचा अभाव असल्याने सत्ताधारी फक्त सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठेच्या मागे आहेत. त्यांना जनतेच्या प्रश्नांशी काही देणेघेणे नाही. निष्क्रिय प्रशासनाला जनतेसमोर उघडे पाडण्यासाठी सत्यबोधी सूर्यनामा केला जाणार असल्याचे अॅड. गवळी यांनी म्हंटले आहे. या आंदोलनासाठी अॅड. गवळी, अशोक सब्बन, कॉ. बाबा आरगडे, यमनाजी म्हस्के, वीरबहादूर प्रजापती, प्रकाश थोरात, हिराबाई ग्यानप्पा, अॅड. गवळी, सुधीर भद्रे, शाहीर कान्हू सुंबे, बाळासाहेब गायकवाड, विठ्ठल सुरम, अशोक भोसले आदी प्रयत्नशील आहेत.