बाबासाहेबांनी अन्याया विरोधात दिलेला लढा कायम स्फुर्ती देणारा -एन.एम. पवळे
अहमदनगर (प्रतिनिधी)- कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्हा परिषद येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी राज्याध्यक्ष एन.एम. पवळे, जिल्हाध्यक्ष के.के. जाधव, कार्याध्यक्ष वसंतराव थोरात, राजीव साळवे, शहराध्यक्ष श्याम गोडळकर, उपाध्यक्ष दत्ता रणसिंग, किसन गोयल आदी उपस्थित होते.
राज्याध्यक्ष एन.एम. पवळे म्हणाले की, भारतीय लोकांना समता बंधुता मिळवून देणारी राज्यघटना लिहिण्याचे महान कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. राज्यघटनेमुळे देशात समता, बंधुता नांदत आहे. बाबासाहेबांनी अन्याया विरोधात दिलेला लढा कायम स्फुर्ती देणारा असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाध्यक्ष के.के. जाधव यांनी तत्कालीन व्यवस्थेविरोधात संघर्ष करून बाबासाहेबांनी दीन-दलितांचा उद्धार केला. बाबासाहेब आंबेडकर व त्यांचे विचार म्हणजे क्रांती होय. शोषितांचा आवाज बुलंद करुन जातिव्यवस्थेने बरबटलेल्या काळोखात बाबासाहेबांनी समाजाला प्रकाशवाट दाखवली असल्याचे त्यांनी सांगितले.
