• Fri. Jan 30th, 2026

बसपाच्या जिल्हा आढावा बैठकीत पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या

ByMirror

Dec 4, 2022

प्रदेश कमिटी सदस्यपदी सुनील ओहळ तर जिल्हाध्यक्षपदी उमाशंकर यादव यांची नियुक्ती

23 डिसेंबरला नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा

अहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजन समाज पार्टीची जिल्हा आढावा बैठक पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीमध्ये शहरातील शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. बसपाचे पश्‍चिम महाराष्ट्र झोन प्रभारी काळूराम चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकित नवीन पदाधिकार्‍यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली. तर गायरान जमीनीवरील अनुसूचित जाती, जमाती व भटके विमुक्त समाजातील नागरिकांचे अतिक्रमणे हटविण्याच्या निर्णयाविरोधात व अहमदनगर शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पंचधातूचा पूर्णाकृती पुतळा बसविण्याच्या मागणीसाठी 23 डिसेंबरला विधी मंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर पुकारलेल्या राज्यव्यापी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.


या बैठकीसाठी शहराध्यक्ष संतोष जाधव, शहर प्रभारी संजय डहाणे, सुनिल ओहळ, उमाशंकर यादव, उपाध्यक्ष सिद्धार्थ पाटोळे, सचिव राजू गुजर, राजू भिंगारदिवे, उत्तर जिल्हाध्यक्ष सुनील मगर, जिल्हा प्रभारी बाळासाहेब मधे, दादाभाऊ जाधव, संतोष वाघ, नितिन जावळे, सलीम आत्तार, राहुल छत्तीसे, महादेव त्रिभुवन, राहुल वाघ, दादाभाऊ जाधव, संतोष केदार आदी उपस्थित होते.


पश्‍चिम महाराष्ट्र झोन प्रभारी काळूराम चौधरी म्हणाले की, बहुजन समाज पार्टी प्रस्थापितांची घराणेशाहीला पायबंद करण्यासाठी पुढे आली आहे. पैश्यातून सत्ता व सत्तेतून पैसा हे प्रस्थापितांचे चक्र बनले आहे. या चक्रात सर्वसामान्यांना डावलून त्यांच्या प्रश्‍नाकडे देखील पाहिले जात नाही. भांडवलदारांचे हित पाहणारी सरकार सत्तेवर असल्याने सर्वसामान्यांचे प्रश्‍न अजून गंभीर होत चालले असून, सर्वसामान्यांतून लोकप्रतिनिधींचा उदय होत नाही तो पर्यंत व्यवस्था बदलणे अवघड होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शहराध्यक्ष संतोष जाधव म्हणाले की, शहराच्या विकासासाठी बहुजन समाज पार्टी शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारधारेने योगदान देत आहे. जिल्ह्यात पक्षाची बांधणी जोमाने सुरू आहे. जिल्ह्यातील घराणेशाही व स्वार्थाच्या राजकारणाने शहर व जिल्ह्याचा विकास खुंटला आहे. लोकप्रतिनिधींनी स्वत:चा विकास साधून जिल्ह्याचा विकास होऊ दिला नाही. शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पंचधातूचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची प्रमुख मागणी राहणार असून, त्यादृष्टीने पाठपुरावा सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय डहाणे यांनी केले. आभार सुनील मगर यांनी मानले.

बसपाच्या पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या

बहुजन समाज पार्टीच्या प्रदेश कमिटी सदस्यपदी सुनील ओहळ, जिल्हाध्यक्षपदी उमाशंकर यादव, पारनेर प्रभारीपदी दादाभाऊ जाधव व पारनेर तालुका अध्यक्षपदी राहुल वाघ यांची या बैठकित निवड करण्यात आली. नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचा सत्कार करुन त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *