• Mon. Jun 22nd, 2026

Mirrornews24

Marathi News

शिक्षण, बालविवाह, बालमजूर, बाल कामगारांचे प्रश्‍नावर आदिवासी, पारधी समाजाला मार्गदर्शन

ByMirror

Nov 24, 2022

क्राय संस्थेच्या चर्चासत्राला जिल्ह्यातील समाजबांधवांचा प्रतिसाद

शिक्षणाने जीवनाचा उध्दार व कल्याण -जयंत ओव्हळ

अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षणाने जीवनाचा उध्दार व कल्याण होणार असून, आदिवासी, पारधी समाजाला अशिक्षितपणाचा कलंक पुसला जाणार आहे. वंचित, दुर्लक्षीत घटकातील मुले शिक्षणाच्या प्रवाहात आल्यास त्यांचे कल्याण होणार आहे. स्थलांतरित कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देण्याची गरज आहे. तर बालविवाहाने मोठे धोके निर्माण होत असून, याबद्दल जनजागृती होणे आवश्यक असल्याचे सांगून बाल कल्याण समितीचे अध्यक्ष जयंत ओव्हळ यांनी बालक व पालकांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती दिली.


जुने टिळक रोड येथील लक्ष्मी नारायण मंगल कार्यालयात क्राय संस्थेच्या (मुंबई) वतीने बालविवाह, बालमजूर, बाल कामगारांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी सहभागीदारी व शासकिय अधिकारी यांच्यासह आयोजित चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रात मार्गदर्शन करताना ओव्हळ बोलत होते. यावेळी बाल कल्याण समितीचे सदस्या बेबी बोरडे, अ‍ॅड. अनुराधा येवले, टी.ए. कवाडे, क्राय संस्थेचे असिस्टंट समीर पांडे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी वैभव देशमुख, स्वागत अध्यक्ष राजेंद्र काळे, शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी रवींद्र कापरे, कामगार कार्यालयाचे पी.एम. भोसले, हारून सय्यद, बाल विकास अधिकारी बी.बी. वारुडकर, तुषार कवडे, अशोक अळकुटे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात राजेंद्र काळे यांनी आदिवासी, पारधी समाजात शाळा बाह्य मुले, बालविवाह, बालमजूर, बाल कामगारांचे प्रश्‍न गंभीर आहेत. हे प्रश्‍न सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील असले, तरी याबाबत समाजामध्ये जनजागृती होण्याच्या उद्देशाने या समाज घटकांना या चर्चासत्रात सहभागी करुन घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


बेबी बोरडे म्हणाल्या की, आदिवासी, पारधी समाजातील महिलांनी शिक्षणाने परिस्थिती बदलण्यासाठी सावित्रीचा वारसा पुढे चालवावा. गुन्हेगारीला पायबंद करण्यासाठी शिक्षण हा एकमेव पर्याय आहे. शिक्षणाचे महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे. खरे व खोटे, चांगले आणि वाईटचा फरक शिक्षणातून समजतो. मुले अनुकरणीय असल्याने त्यांच्या समोर चांगला आदर्श ठेवण्याचे त्यांनी सांगितले. वैभव देशमुख यांनी मुलांना समजून घेणे आवश्यक आहे. तर त्यांच्या परिस्थितीचा अभ्यास करुन त्या दृष्टीने त्यांना विकासासाठी दिशा देण्याचे त्यांनी सांगितले.


विस्तार अधिकारी रवींद्र कापरे यांनी मोफत व सक्तीचे शिक्षणाची माहिती देऊन, स्थलांतरित मुलांना शिक्षणाचा हक्क मिळाला पाहिजे. परिस्थिती बदलायची असेल तर शिक्षणापासून सुरुवात करावी लागणार आहे. शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना विविध योजना असल्याचे त्यांनी सांगियले.

समीर पांडे म्हणाले की, मुलांच्या न्याय, हक्कासाठी व वंचित घटकांसाठी क्राय संस्था कार्यरत आहे. शासनाच्या योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी संस्था प्रयत्नशील असून, संवेदनशीलतेने हे कार्य केले जात आहे. मुलांच्या हक्काचे संरक्षण करण्याचे महत्त्वाचे कार्य संस्थेच्या माध्यमातून सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विस्तार अधिकारी कोरड, नंदा साळवे, प्रकाश कदम, मंदा कांबळे, आरती भोसले, दिगंबर शेलार, शशिकांत शिरसाठ आदींसह मोठ्या संख्येने आदिवासी, पारधी समाज बांधव उपस्थित होते.


By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *