• Sat. Mar 7th, 2026

अशोकभाऊ फिरोदियात रंगली वक्तृत्व स्पर्धा

ByMirror

Sep 17, 2022

ऐन वेळेस मिळालेल्या विषयांवर बोलते झाले शालेय विद्यार्थी

सेक्रेडहार्ट कॉन्व्हेंट हायस्कूलने पटकाविला सांघिक फिरता करंडक

अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये वक्तृत्व स्पर्धा उत्साहात पार पडली. संस्थेचे संस्थापक स्व. अशोकभाऊ फिरोदिया यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत सेक्रेडहार्ट कॉन्व्हेंट हायस्कूलने स्पर्धेचा सांघिक फिरता करंडक पटकाविला. ही स्पर्धा शहरातील व परिसरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रमुख आकर्षण असते, याचे प्रमुख वैशिष्टये म्हणजे स्पर्धकांना ऐन वेळेस विषय देऊन त्यावर विचार मांडण्यास सांगितले जाते.


अशोकभाऊ फिरोदिया शाळेच्या सभागृहात झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत 21 शाळांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेचे उद्घाटन स्कूल कमिटीचे चेअरमन अ‍ॅड. गौरव मिरीकर यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अहमदनगर महाविद्यालयाचे माजी प्रा. चंद्रकांत जोशी, डॉ. सुचित्रा डावरे उपस्थित होते.


स्व. अशोकभाऊ फिरोदिया व स्व. शांतीकुमारजी फिरोदिया यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलनाने स्पर्धेला प्रारंभ झाले. वैदेही गायकवाड यांनी स्पर्धेविषयी स्पर्धकांना माहिती दिली. रेणुका पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. कविता लोंढे यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. विद्यालयाचे प्राचार्य प्रभाकर भाबड यांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.


माजी प्रा. चंद्रकांत जोशी म्हणाले की, आपले विचार प्रकट करुन, ते इतरांच्या मनात रुजवणे ही वक्तृत्वाची कला आहे. वक्तृत्व कला अवगत असलेला व्यक्ती आपल्या मनातील भावना चांगल्या पध्दतीने व्यक्त करुन, ते इतरांना देखील उत्तमप्रकारे समजावत असतो. उत्कृष्ट वक्तृत्व हा हुशार विद्यार्थ्याचा दागिना असल्याचे त्यांनी सांगितले.
अ‍ॅड. गौरव मिरीकर यांनी आपले विचार समोरच्या व्यक्तीला समजवून पटवणे ही एक अवघड कला आहे. विविध क्षेत्रात बोलक्या व हुशार विद्यार्थी सर्वांचे लक्ष आकर्षित करतात. हुशारी बरोबर हजर जबाबी असणे, काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. अपर्णा हातवळणे यांनी स्पर्धेचे नियम व अटी स्पर्धकांना सांगितल्या.


विविध विषयांवर रंगलेल्या वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मनमोकळे आपल्या भावना मांडल्या. या स्पर्धेत प्रथम क्रमांक- प्रणाली बाबासाहेब कडूस (रामकृष्ण इंग्लिश मीडियम स्कूल, इ. आठवी) द्वितीय क्रमांक- वेदांती सुनील डोंगरे (सेक्रेडहार्ट कॉन्व्हेंट हायस्कूल, इ. दहावी) तृतीय क्रमांक- साई विशाल चासकर (जय बजरंग माध्यमिक विद्यालय, इ. दहावी), उत्तेजनार्थ- सिद्धार्थ दिलीप खराडे (रूपीबाई मोतीलालजी बोरा, न्यू इंग्लिश स्कूल), चैतन्य रावसाहेब गर्जे (भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल) यांनी बक्षिसे पटकाविली. संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया, उपाध्यक्ष अशोक मुथा, खजिनदार प्रकाश गांधी व सहकार्यवाह गौरव फिरोदिया यांनी विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन केले.


संस्थेच्या विश्‍वस्त मंडळ सदस्या सुनंदाताई भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली बक्षिस वितरण कार्यक्रम पार पडला. स्पर्धेचे परीक्षक डॉ. सुचित्रा डावरे यांनी विद्यार्थ्यांना वक्तृत्व अधिक चांगले व उत्तम होण्यासाठी मार्गदर्शन केले. उन्नती नगरकर यांनी आभार मानले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व अध्यापक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *