बालविवाह, बालमजुरी आणि लैंगिक शोषणाविरोधात विद्यार्थ्यांना कायद्याचे धडे!;
विद्यार्थ्यांच्या सुरक्षित बालपणासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा पुढाकार!
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 136 व्या पुण्यतिथीनिमित्त सारसनगर येथील कै. दामोधर विधाते (मास्तर) विद्यालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अंतर्गत ‘सुरक्षित बचपन अभियान’चा शुभारंभ करण्यात आला. या अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बालविवाह प्रतिबंधक कायदा, बालकामगार कायदा, पॉक्सो कायदा तसेच मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. बालकांचे हक्क, संरक्षण आणि सुरक्षिततेविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा उद्देश या उपक्रमातून ठेवण्यात आला.
कार्यक्रमात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे मीडिएटर पॅनेल ॲडव्होकेट पी. एन. पाटोळे आणि ॲड. अनिल अंधारे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून विविध कायद्यांची माहिती दिली. यावेळी संस्थेचे सरचिटणीस प्रा. शिवाजीराव विधाते, मुख्याध्यापक शिवाजी म्हस्के, संतोष सुसे यांच्यासह शाळेतील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या पॅनेलमधील अर्चना इथापे, सेजल घनवट, दीपाली परदेशी, शोभा गाढे आदींनीही कार्यक्रमास उपस्थिती लावली.
ॲड. पी. एन. पाटोळे यांनी बालविवाह प्रतिबंधक कायदा, बालकामगार कायदा आणि पॉक्सो कायद्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. बालविवाह ही सामाजिक समस्या असून बालवयात विवाह झाल्यामुळे मुलांच्या शिक्षणावर, आरोग्यावर आणि भविष्यावर विपरीत परिणाम होतात. बालकांना शिक्षणाचा आणि सुरक्षित बालपणाचा अधिकार आहे. बालकामगार प्रथेमुळे मुलांचे बालपण हिरावले जाते. तसेच बालकांचे लैंगिक शोषण रोखण्यासाठी पॉक्सो कायद्याची तरतूद करण्यात आली आहे. या कायद्यांची माहिती प्रत्येक विद्यार्थ्याला असणे आवश्यक असून, स्वतःच्या संरक्षणासोबतच इतर बालकांच्या हक्कांबाबतही जागरूक राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
ॲड. अनिल अंधारे यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलच्या अतिवापरामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती दिली. मोबाईलचा अनावश्यक वापर केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर, एकाग्रतेवर आणि दैनंदिन जीवनशैलीवर परिणाम होऊ शकतो. सोशल मीडियाचा अतिरेक, ऑनलाइन गेमिंग आणि मोबाईलच्या आहारी जाण्यामुळे विद्यार्थ्यांचा मौल्यवान वेळ वाया जातो. त्यामुळे मोबाईलचा वापर आवश्यक तेवढाच आणि योग्य कारणांसाठी करावा. तंत्रज्ञानाचा वापर ज्ञान मिळविण्यासाठी करावा, त्याचे व्यसन होऊ देऊ नये, असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
संस्थेचे सरचिटणीस प्रा. शिवाजीराव विधाते म्हणाले की, महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील अज्ञान आणि अन्याय दूर करण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. मुला-मुलींना शिक्षणाची संधी मिळावी आणि समाजात समानतेची भावना निर्माण व्हावी, यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले. आजच्या काळात विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान देणे पुरेसे नसून त्यांना कायद्याची माहिती, सामाजिक जबाबदारी आणि स्वतःच्या सुरक्षिततेविषयी जागरूक करणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजी म्हस्के यांनी केले. सूत्रसंचालन सविता सोनवणे यांनी केले, तर सुजाता दरेकर यांनी आभार मानले.

