निंबळक जिल्हा परिषद शाळेत सपत्नीक सन्मान
विद्यार्थ्यांनीही जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर ध्येय गाठावे – डॉ. दिलीप पवार
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी मनात जिद्द, ध्येयाप्रती निष्ठा आणि मेहनतीची तयारी असेल तर यश निश्चित मिळते. आर्थिक अडचणींवर मात करत प्रिंटिंग प्रेसमध्ये कामगार म्हणून आपल्या संघर्षमय प्रवासाची सुरुवात करणारे आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर राज्यकर अधिकारीपदापर्यंत मजल मारणारे अर्जुन दशरथ दारकुंडे यांचा जीवनप्रवास विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. विद्यार्थ्यांनीही आई-वडिलांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर आपले ध्येय गाठावे, असे प्रतिपादन पंचायत समितीचे माजी उपसभापती डॉ. दिलीप पवार यांनी केले.
निंबळक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अर्जुन दारकुंडे यांची राज्यकर अधिकारीपदी पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचा पत्नी रोहिणी दारकुंडे यांच्यासह सपत्नीक सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. दिलीप पवार होते. एका सामान्य कुटुंबातून पुढे येत प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करून प्रशासकीय सेवेत यश मिळविणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा गौरव शाळेच्या प्रांगणात करण्यात आला.
यावेळी माजी उपसरपंच घनश्याम म्हस्के यांनी अर्जुन दारकुंडे यांच्या संघर्षमय प्रवासाचे कौतुक केले. ते म्हणाले, आगडगावसारख्या डोंगराळ भागातून प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर अर्जुन यांनी प्रतिकूल आर्थिक परिस्थितीत पुण्यात जाऊन उच्च शिक्षण पूर्ण केले. शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी त्यांनी हॉटेलमध्ये काम केले. अनेक अडचणींचा सामना करत त्यांनी आपले शिक्षण आणि ध्येय यांची सांगड घातली. आज त्याच संघर्षाच्या जोरावर त्यांनी अधिकारीपदापर्यंत मजल मारली आहे.
ज्या मातीत आपण घडलो, त्याच शाळेत आणि गावात आपल्या कर्तृत्वाचा सन्मान होणे ही आयुष्यातील अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. रोहिणी दारकुंडे यांनीही याच शाळेत शिक्षण घेतले असून शाळेच्या विविध उपक्रमांमध्ये योगदान दिले आहे. त्यामुळे दारकुंडे दाम्पत्याचा शाळेत होणारा सन्मान हा विशेष आनंदाचा क्षण असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येकाने आपल्या आवडीच्या क्षेत्रात प्राविण्य मिळविण्याचा प्रयत्न करावा. केवळ शासकीय नोकरीतच नव्हे, तर शेती आणि व्यवसायातही आपल्या कर्तृत्वाची छाप उमटविता येते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शाळेचे मुख्याध्यापक एम. बी. कोल्हे यांनी प्रास्ताविकपर मनोगतात अर्जुन दारकुंडे यांच्या यशस्वी वाटचालीचा गौरव केला. ते म्हणाले, अत्यंत सामान्य कुटुंबात जन्म घेऊन प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत अर्जुन यांनी असामान्य यश संपादन केले आहे. त्यांच्या पत्नी रोहिणी या याच शाळेच्या माजी विद्यार्थिनी असल्याने दारकुंडे कुटुंबाचे शाळेशी जिव्हाळ्याचे नाते असल्याचे स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांना कर्तृत्ववान व्यक्तींच्या जीवनप्रवासाची ओळख व्हावी, त्यांच्या संघर्षातून प्रेरणा मिळावी आणि आपल्यालाही भविष्यात मोठे अधिकारी होता येईल, अशी जिद्द त्यांच्या मनात निर्माण व्हावी, या उद्देशाने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अर्जुन दारकुंडे यांनी भविष्यात आणखी मोठ्या पदावर पोहोचून शाळेचा आणि परिसराचा नावलौकिक वाढवावा, अशी अपेक्षाही यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. दिलीप पवार म्हणाले की, विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच आई-वडिलांची स्वप्ने पूर्ण करण्याचे ध्येय मनाशी बाळगले पाहिजे. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी जिद्द, चिकाटी, मेहनत आणि चांगले संस्कार या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. शाळेच्या प्रांगणात लागलेली शिस्त विद्यार्थ्यांना आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी उपयोगी पडते.
कोणत्याही क्षेत्रात यश मिळविण्यासाठी केवळ स्वतःची मेहनत पुरेशी नसते, तर कुटुंबीयांची साथ आणि शिक्षकांचे मार्गदर्शनही तितकेच महत्त्वाचे असते. अर्जुन दारकुंडे यांच्या यशामागे त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेली खंबीर साथ आणि शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या संघर्षातून प्रेरणा घेऊन अभ्यासात सातत्य ठेवावे आणि परिस्थितीला न घाबरता आपले ध्येय साध्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
सत्काराला उत्तर देताना अर्जुन दारकुंडे यांच्या पत्नी रोहिणी यांनी त्यांच्या संघर्षमय प्रवासातील अनेक आठवणींना उजाळा दिला. त्या म्हणाल्या की, त्यांनी याच शाळेत दोन वर्षे रेमेडियल एज्युकेटर म्हणून काम केले असून, त्यावेळी शाळेतील शिक्षकांनी त्यांना मोलाचे सहकार्य केले. त्यामुळे या शाळेत दारकुंडे दाम्पत्याचा सन्मान होणे ही त्यांच्यासाठी भावनिक आणि आनंदाची बाब आहे.
अर्जुन यांची सुरुवातीची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. शिक्षण सुरू ठेवण्यासाठी त्यांनी प्रिंटिंग प्रेसमध्ये कामगार म्हणून काम केले. बी.एस्सी.चे शिक्षण घेत असताना तहसील कार्यालयात अर्धवेळ नोकरी केली. त्यानंतर पुण्यात उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतल्यानंतर महाविद्यालयाच्या मेसमध्ये वेटर म्हणून काम करून शिक्षणाचा खर्च भागविला. परिस्थितीशी संघर्ष करत त्यांनी शिक्षण आणि नोकरी यांचा समतोल साधला.
२०१७ मध्ये त्यांची जीएसटी विभागात टॅक्स असिस्टंट म्हणून नियुक्ती झाली. २०१८ मध्ये आमचा विवाह झाला. मात्र, नोकरी मिळाल्यानंतरही त्यांनी अभ्यासाची जिद्द सोडली नाही. सकाळी लवकर उठून अभ्यास करणे आणि त्यानंतर कार्यालयात जाणे, असा त्यांचा दिनक्रम होता. अनेक वर्षे त्यांनी अभ्यासासाठी स्वतःला पूर्णपणे झोकून दिले. सातत्य, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी आज राज्यकर अधिकारीपदापर्यंत मजल मारली आहे. त्यांच्या या प्रवासात कुटुंब म्हणून साथ देता आली, याचे मोठे समाधान आहे. शाळेने त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेऊन सत्कार केल्याबद्दल मुख्याध्यापक, शिक्षक आणि शाळा व्यवस्थापनाचे त्यांनी आभार मानले.
यावेळी सुनिता रणदिवे, दत्तात्रय दिवटे आणि समीर पटेल यांनीही मनोगत व्यक्त करून अर्जुन दारकुंडे यांच्या यशाचे कौतुक केले. त्यांच्या संघर्षातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी, असे सांगत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला ग्रामसेवक रासकर, ग्रामपंचायत प्रशासक आंबेडकर, बी. डी. कोतकर, महेश म्हस्के, दत्ता धावडे यांच्यासह शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रघुनाथ झावरे यांनी केले. सूत्रसंचालन सुरेश कार्ले यांनी केले, तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

