• Tue. Nov 24th, 2026

Mirrornews24

Marathi News

आयडीबीआय बँकेच्या खाजगीकरणाविरोधात अहिल्यानगरमध्ये गुरुवारी बँक कर्मचाऱ्यांचा एल्गार!

ByMirror

Nov 24, 2026
सार्वजनिक बँकिंग क्षेत्रापुढील आव्हानांवर होणार विचारमंथन

बँक कर्मचारी चळवळीची दिशा उलगडणार; विशेष मार्गदर्शन सभा


सार्वजनिक बँकिंग क्षेत्रापुढील आव्हानांवर होणार विचारमंथन


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सार्वजनिक बँकिंग क्षेत्रासमोर निर्माण झालेली आव्हाने, आयडीबीआय बँकेच्या प्रस्तावित खाजगीकरणाचे संभाव्य परिणाम आणि त्याचा बँक कर्मचारी चळवळीवर होणारा प्रभाव या महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यासाठी अहिल्यानगरमध्ये गुरुवारी (दि. २६ नोव्हेंबर) विशेष मार्गदर्शन व संवाद सभेचे आयोजन करण्यात आले आहे. अहिल्यानगर जिल्हा बँक कर्मचारी संघटनेच्या वतीने दिल्लीगेट येथील स्पाय हॉटेलमध्ये सायंकाळी ५ वाजता ही सभा होणार आहे.


देशातील सार्वजनिक बँकिंग व्यवस्थेचे भवितव्य, बँकिंग क्षेत्रातील बदलती धोरणे, खासगीकरणाचे संभाव्य परिणाम आणि बँक कर्मचाऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण या विषयांना सध्या विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर बँकिंग उद्योगातील सद्यस्थितीचा आढावा घेऊन कर्मचारी चळवळीपुढील आव्हाने आणि आगामी संघर्षाची दिशा यावर या सभेत सविस्तर विचारमंथन केले जाणार आहे.


या सभेच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य बँक कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष कॉ. धनंजय कुलकर्णी राहणार आहेत. बेट्राचे अध्यक्ष तसेच आयडीबीआय कर्मचारी संघटनांच्या संयुक्त मंचाचे (युनायटेड फोरम ऑफ आयडीबीआय युनियन्स) निमंत्रक कॉ. देविदास तुळजापूरकर हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहून ‘आयडीबीआय बँकेचे खाजगीकरण आणि बँक कर्मचारी चळवळीपुढील आव्हाने’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.


यावेळी महाराष्ट्र राज्य बँक कर्मचारी महासंघाचे सहसचिव कॉ. शिरीष राणे आणि विभागीय सचिव कॉ. नरेंद्र जंगम यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. बँकिंग क्षेत्रातील संघटनात्मक भूमिका, कर्मचारी हिताचे प्रश्न, सार्वजनिक बँकांचे महत्त्व आणि बदलत्या आर्थिक धोरणांच्या पार्श्वभूमीवर कर्मचारी संघटनांसमोरील आव्हाने याबाबत या सभेत विचार मांडले जाणार आहेत.
मुख्य मार्गदर्शन सभेपूर्वी दुपारी ४ ते ५ या वेळेत बँकांमधील हंगामी कर्मचारी आणि व्यवसाय प्रतिनिधी (बँक मित्र) यांच्यासाठी स्वतंत्र विशेष सत्र आयोजित करण्यात आले आहे. या सत्रात हंगामी कर्मचाऱ्यांच्या समस्या, त्यांचे हक्क, कामाच्या ठिकाणी येणाऱ्या अडचणी तसेच व्यवसाय प्रतिनिधींचे प्रश्न आणि भविष्यातील वाटचाल यावर मार्गदर्शन केले जाणार आहे. या विशेष सत्राचा लाभ घेण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेने केले आहे.


सार्वजनिक बँकिंग व्यवस्थेचे महत्त्व, बँकिंग उद्योगातील बदलते स्वरूप आणि कर्मचारी चळवळीची भविष्यातील भूमिका समजून घेण्यासाठी ही सभा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयीकृत, सार्वजनिक तसेच इतर बँकांमधील कार्यरत कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी, हंगामी कर्मचारी आणि व्यवसाय प्रतिनिधी यांनी या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अहिल्यानगर जिल्हा बँक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष माणिक अडाणे, सरचिटणीस कांतिलाल वर्मा, कॉ. सुजय नळे आणि कॉ. प्रकाश कोटा यांनी केले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *