• Fri. Nov 20th, 2026

Mirrornews24

Marathi News

कॉम्रेड डॉ. अजित नवले यांचा रविवारी ‘स्वराज्यसेनानी’ लोकगौरवाने होणार सन्मान

ByMirror

Nov 20, 2026
लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी लढणाऱ्यांचा करणार गौरव -ॲड. कारभारी गवळी

स्वातंत्र्यसेनानींच्या पावलावर पाऊल; आता ‘स्वराज्यसेनानीं’ना मिळणार राष्ट्रीय प्रतिष्ठा!; पीपल्स हेल्पलाइन आणि भारतीय जनसंसदेचा पुढाकार


लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी लढणाऱ्यांचा करणार गौरव -ॲड. कारभारी गवळी


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्यसेनानींच्या त्याग आणि संघर्षाचा इतिहास देशाच्या अभिमानाचा विषय आहे. मात्र, 15 ऑगस्ट 1947 रोजी देशाला राजकीय स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही सर्वसामान्य नागरिकांना संविधानाने दिलेले अधिकार, सामाजिक न्याय आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी संघर्षाची गरज कायम आहे. लोकशाही मूल्यांचे रक्षण, संविधानाची अंमलबजावणी तसेच शेतकरी, आदिवासी, शेतमजूर आणि कष्टकरी वर्गाच्या न्याय्य हक्कांसाठी लढणाऱ्या आधुनिक काळातील लढवय्यांना स्वतंत्र ओळख आणि राष्ट्रीय प्रतिष्ठा मिळावी, या उद्देशाने ‘स्वराज्यसेनानी’ ही अभिनव लोकसन्मान संकल्पना पुढे आणण्यात आली आहे.
पीपल्स हेल्पलाइन आणि भारतीय जनसंसदेच्या वतीने या संकल्पनेअंतर्गत शेतकरी व आदिवासींच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करणारे झुंजार नेते कॉम्रेड डॉ. अजित नवले यांना ‘स्वराज्यसेनानी’ या किताबाने गौरविण्यात येणार आहे. रविवार, दि. 22 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता अहिल्यानगर येथील ऐतिहासिक हुतात्मा स्मारकात हा लोकगौरव सोहळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. कारभारी गवळी यांनी दिली.


स्वातंत्र्यपूर्व काळात परकीय सत्तेविरुद्ध लढा देणाऱ्या क्रांतिकारकांना आणि देशभक्तांना ‘स्वातंत्र्यसेनानी’ म्हणून ओळखले जाते. त्याच धर्तीवर स्वातंत्र्यानंतर देशात खऱ्या अर्थाने लोकशाही व्यवस्था रुजविण्यासाठी, संविधानातील मूलभूत अधिकार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि अन्यायकारक व्यवस्थेविरुद्ध संघर्ष करणाऱ्या व्यक्तींना ‘स्वराज्यसेनानी’ म्हणून ओळख मिळावी, अशी या संकल्पनेची भूमिका आहे.


स्वराज्य म्हणजे केवळ राजकीय सत्तांतर नव्हे, तर समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय, समानता, स्वातंत्र्य आणि सन्मान पोहोचणे होय. शेतकरी, आदिवासी, शेतमजूर, महिला आणि वंचित घटकांना संविधानाने दिलेले अधिकार प्रत्यक्षात मिळावेत, शासनव्यवस्था ही मूठभरांच्या हिताऐवजी सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी कार्यरत राहावी, यासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचा गौरव करणे आवश्‍यक आहे. याच विचारातून ‘स्वराज्यसेनानी’ या लोकसन्मानाची निर्मिती करण्यात आली आहे.


डॉ. अजित नवले यांनी शेतकरी चळवळीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांना सातत्याने वाचा फोडली आहे. शेतीवर अवलंबून असलेल्या कष्टकरी कुटुंबांना न्याय मिळावा, त्यांच्या श्रमाला योग्य मोबदला मिळावा आणि शेती क्षेत्रातील प्रश्‍नांची प्रभावी सोडवणूक व्हावी, यासाठी त्यांनी विविध आंदोलनांच्या माध्यमातून संघर्ष केला आहे. यासोबतच पिढ्यान्‌पिढ्या वनजमिनीवर उदरनिर्वाह करणाऱ्या आदिवासी बांधवांना त्यांच्या हक्काच्या जमिनी मिळाव्यात, वनहक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी आणि आदिवासी समाजाला न्याय व सन्मानाचे जीवन जगता यावे, यासाठीही त्यांनी लढा उभारला आहे. वंचित आणि कष्टकरी घटकांच्या प्रश्‍नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची त्यांची भूमिका लक्षात घेऊन पीपल्स हेल्पलाइन आणि भारतीय जनसंसदेने त्यांची ‘स्वराज्यसेनानी’ या सन्मानासाठी निवड केली आहे.


‘स्वराज्यसेनानी’ ही संकल्पना केवळ आंदोलन किंवा संघर्षापुरती मर्यादित नसून ती समाजपरिवर्तनाच्या व्यापक विचाराशी जोडलेली आहे. लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्ती यांसोबतच संविधानिक नैतिकता आणि कायद्याचे राज्य या मूल्यांना या चळवळीचा आधार मानण्यात आला आहे. निःस्वार्थ सार्वजनिक कार्य, विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, सामाजिक न्याय, लोकशाही मूल्यांचे संवर्धन आणि निसर्गाचे संरक्षण यांसाठी काम करणाऱ्या प्रत्येक कृतिशील नागरिकाला या संकल्पनेतून प्रेरणा आणि नवी ओळख मिळावी, हा आयोजकांचा प्रयत्न आहे. स्वातंत्र्यसेनानींनी देशाला परकीय सत्तेच्या जोखडातून मुक्त केले, तर स्वराज्यसेनानींनी त्या स्वातंत्र्याचे लोककल्याणकारी व्यवस्थेत रूपांतर करण्यासाठी संघर्ष करावा, अशी या उपक्रमामागील मध्यवर्ती भूमिका आहे.


या सोहळ्यात डॉ. अजित नवले यांना ‘स्वराज्यसेनानी’ हा लोकगौरव प्रदान करण्यात येणार असून, शेतकरी, आदिवासी, कष्टकरी, सामाजिक कार्यकर्ते आणि संविधानप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. या सन्मान सोहळ्यासाठी ॲड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, ॲड. अमित थोरात, शाहीर कान्हू सुंबे, राहुल आढाव, बाळासाहेब पालवे, आनंद आढाव, अशोक भोसले, पोपट भोसले, वीर बहादुर प्रजापती, अभिमान शिंदे, बाबासाहेब भोसले आदी प्रयत्नशील आहेत.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *