• Wed. Nov 18th, 2026

Mirrornews24

Marathi News

लहुजी वस्ताद साळवेंच्या समाधीस्थळी अहिल्यानगरचे सामाजिक कार्यकर्ते नतमस्तक

ByMirror

Nov 17, 2026
लहुजी वस्ताद साळवेंच्या समाधीस्थळी अहिल्यानगरचे सामाजिक कार्यकर्ते नतमस्तक

महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारप्राप्तांच्या विविध मागण्यांसाठी आमदार अमित गोरखेंना निवेदन!


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त अहिल्यानगर शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी पुणे येथील संगमवाडी पुलाजवळ असलेल्या त्यांच्या समाधीस्थळी जाऊन नतमस्तक होत अभिवादन केले. यावेळी लहुजी वस्तादांच्या विचारांचे स्मरण करून त्यांच्या क्रांतिकारी कार्याला उजाळा देण्यात आला. या अभिवादन सोहळ्यास अहिल्यानगरमधील लहुसेनेचे कार्यकर्ते आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र शासनाचा साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे पुरस्कार प्राप्त नामदेवराव चांदणे, डॉ. सुनील सकट, लहु खंडागळे, संजय त्रिभुवन, मिनाक्षीताई सकट, शेषराव कारखिले, भगवानराव वैरागर, कडुबाबा लोंढे, लक्ष्मण साबळे आदींसह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी समाधीस्थळी अभिवादन केले.


दरम्यान, महाराष्ट्र शासन पुरस्कारप्राप्त महासंघाच्या वतीने विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शासनाकडून पुरस्कार प्राप्त करणाऱ्यांच्या सामाजिक योगदानाची दखल घेऊन त्यांना सन्मानपूर्वक आर्थिक व सामाजिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.


महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार प्राप्तांना दरमहा 15 हजार रुपये पेन्शन सुरू करावी, तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या एसटी बसमधून राज्यभर मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. याशिवाय साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला भारतरत्न पुरस्कार प्रदान करावा, अशी मागणीही करण्यात आली. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनुसूचित जातींचे अ, ब, क, ड असे उपवर्गीकरण तातडीने लागू करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. या सर्व मागण्यांबाबत शासनस्तरावर सकारात्मक निर्णय घेऊन पुरस्कारप्राप्त मान्यवरांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *