• Wed. Nov 11th, 2026

Mirrornews24

Marathi News

वंचितांची दिवाळी गोड करत हरदिन मॉर्निंग ग्रुपचा सामाजिक पाडवा!

ByMirror

Nov 11, 2026
भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

निराधार व आर्थिक दुर्बल घटकांना मिठाई आणि फराळाचे वाटप; वंचितांच्या चेहऱ्यावर फुलविले दिवाळीचे हास्य!


भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शिक्षण, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक उत्तरदायित्वाची बांधिलकी जपत गेल्या 27 वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने दिवाळी पाडवा सामाजिक संवेदनशीलतेने साजरा करण्यात आला. दिवाळीचा आनंद समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा आणि वंचितांच्या आयुष्यातही आनंदाचे क्षण फुलावेत, या उद्देशाने भिंगार परिसरातील निराधार व आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींना मिठाई आणि दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपणाचा उपक्रमही राबविण्यात आला.


भिंगार येथील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये आयोजित या उपक्रमात हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ आणि उद्योजक लॉरेन्स स्वामी यांच्या हस्ते निराधार व आर्थिक दुर्बल घटकांतील नागरिकांना मिठाई व फराळाचे वाटप करण्यात आले. सणासुदीच्या काळात आर्थिक परिस्थितीमुळे अनेकांना दिवाळीचा आनंद मनमुरादपणे साजरा करता येत नाही. अशा व्यक्तींच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.


याच कार्यक्रमात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देऊन वृक्षारोपण करण्यात आले. वृत्तपत्र छायाचित्रकार वाजिद शेख आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमाचे पत्रकार जहीर सय्यद यांच्या हस्ते जॉगिंग पार्कमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. सामाजिक कार्यासोबतच निसर्गाचे जतन आणि संवर्धन करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. यावेळी ताराचंद ठोकळ, रमेश वराडे, सर्वेश सपकाळ, अशोक पराते, दिलीप ठोकळ, मेजर दीपक धाडगे, सचिन चोपडा, संजय भिंगारदिवे, अशोक लोंढे, सखाराम अळकुटे, रतनशेठ मेहेत्रे, ज्ञानेश्वर महाराज अनावडे, अभिजीत सपकाळ, जैद सय्यद, जालिंदर बेल्हेकर, अविनाश जाधव, सुधीर कपाळे, जोगिंदरसिंग, उमाशंकर पंडित, जालिंदर अळकुटे, जियान सय्यद, रामनाथ गर्जे, कुमार धतुरे, दीपक घोडके, सुभाष पेंढुरकर, मुन्ना वाघस्कर, अनिल सोळसे, दशरथ मुंडे, राजुशेठ चंगेडिया, प्रशांत भिंगारदिवे, पत्रकार आबिद दुल्हेखान, दिलीप गुगळे, शिरीष पोटे, योगेश चौधरी, किरण फुलारी, विशाल भामरे, जमान मुजावर आदी उपस्थित होते.


संजय सपकाळ म्हणाले की, हरदिन मॉर्निंग ग्रुप सामाजिक संवेदना जागृत ठेवून शिक्षण, पर्यावरण संवर्धन आणि आरोग्य जागृती या क्षेत्रांत सातत्याने कार्यरत आहे. ग्रुपचे प्रत्येक सदस्य सामाजिक कार्यात आपापल्या परीने योगदान देत असून, समाजाप्रती असलेली बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला जात आहे. दिवाळी हा आनंद आणि आपुलकीचा सण आहे. हा आनंद केवळ आपल्यापुरता मर्यादित न ठेवता वंचितांपर्यंत पोहोचावा, त्यांच्या चेहऱ्यावरही समाधानाचे हास्य फुलावे, या भावनेतून पाडव्याच्या दिवशी मिठाई व फराळ वाटपाचा उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.


उद्योजक लॉरेन्स स्वामी यांनी हरदिन मॉर्निंग ग्रुप वंचित आणि गरजूंसाठी एक आधार बनला असल्याचे सांगितले. निरोगी आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक चळवळीच्या माध्यमातून ग्रुपने सातत्याने सुरू ठेवलेले कार्य प्रेरणादायी आहे. प्रत्येक क्षेत्रातील व्यक्ती या ग्रुपशी जोडली गेली असून, सामाजिक बांधिलकी जपणारे हे एक मोठे कुटुंब बनले आहे. समाजातील विविध घटकांना सोबत घेऊन असे उपक्रम राबविणे ही कौतुकास्पद बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.


यावेळी वाजिद शेख यांनीही हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देण्याबरोबरच पर्यावरण आणि आरोग्याविषयी जनजागृती करण्याचे कार्य ग्रुपकडून होत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात संजय चोपडा यांनी हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या गेल्या 27 वर्षांतील सामाजिक कार्याचा आढावा घेतला. विविध सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरणपूरक आणि आरोग्यविषयक उपक्रमांच्या माध्यमातून ग्रुपने समाजात सकारात्मक योगदान दिले असल्याचे त्यांनी सांगितले. जहीर सय्यद यांनी उपस्थितांचे आभार मानले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *