दत्ता जाधव यांच्या भूमिकेमुळे तत्कालीन कारभार पुन्हा ऐरणीवर
कायदेशीर परवानगी नसल्याचा व बनावट ठराव घेतल्याचा आरोप
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- चिचोंडी पाटील (ता. नगर) येथील संगम चौकातील पावन गणेश मंदिराजवळील ग्रामपंचायत व शासनाच्या जागेवर झालेल्या अनधिकृत बांधकामाप्रकरणी अखेर प्रशासनाने अनियमितता झाल्याची लेखी कबुली दिली आहे. सामाजिक कार्यकर्ते दत्ता हरिभाऊ जाधव यांच्या पाठपुराव्यामुळे आणि उपोषणाच्या इशाऱ्यानंतर जिल्हा प्रशासनाला जाग आली असून, तत्कालीन ग्रामपंचायत अधिकाऱ्यास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
मात्र, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या तत्कालीन सरपंचांवर अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने, पंचायत समितीच्या वेळकाढू धोरणाविरोधात आणि राजकीय दबावाच्या निषेधार्थ जिल्हा परिषदेसमोर उपोषण करण्याच्या भूमिकेवर दत्ता जाधव ठाम आहेत.
संगम चौकातील पावन गणेश मंदिराशेजारील ग्रामपंचायत व महाराष्ट्र शासनाच्या जागेवर गावातील एका व्यक्तीने कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता बहुमजली बांधकाम सुरू केले होते. नियमानुसार ग्रामपंचायत मालकीच्या जागेवर असे बांधकाम करता येत नाही, तसेच शासनाच्या जागेसाठी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना विभागाची बांधकाम परवानगी अनिवार्य असतें.
या प्रकरणात अनेक गंभीर बाबी उघडकीस आल्या आहेत. ग्रामपंचायतीकडे कागदपत्रांची मागणी केली असता, एकाच दिवशी एकाच जावक क्रमांकाचे दोन वेगवेगळे ‘ना हरकत’ दाखले देण्यात आल्याचे समोर आले. बनावट ठराव: ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत ज्या महिला सदस्यांना सदर ठरावासाठी सूचक व अनुमोदक दाखवण्यात आले होते, त्यांनी प्रत्यक्षात असा कोणताही ठराव चर्चेला आला नसल्याचे आणि आपण सूचक-अनुमोदक नसल्याचे लेखी पत्र प्रशासनाला दिले.
याप्रकरणी 17 सप्टेंबर 2026 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अहिल्यानगर यांच्याकडे कारवाईची मागणी करण्यात आली. कसलीही कारवाई न झाल्याने 12 ऑक्टोबर 2026 रोजी स्मरणपत्र देण्यात आले आणि 4 नोव्हेंबर 2026 रोजी उपोषणाचा इशारा देण्यात आला. उपोषणाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने अनियमितता मान्य केली असली, तरी तत्कालीन सरपंचांना अद्याप पाठीशी घातले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
चिचोंडी पाटील ग्रामपंचायतीमध्ये असा गैरकारभार होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी सन 2018-19 मध्येही ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या गैरकारभाराबाबत दत्ता हरिभाऊ जाधव यांनी अर्ज केला होता. त्यावेळेस उपसरपंच शरद खंडू पवार आणि ग्रामपंचायत अधिकारी मनीष लोखंडे हे पदावर कार्यरत होते. त्या काळात तत्कालीन गटविकास अधिकारी तथा प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी असिमा मित्तल यांनी ग्रामपंचायतीमध्ये गैरकारभार झाल्याचे स्पष्टपणे मान्य करत कारवाईचे आदेश दिले होते. यावरून या गावात पूर्वीपासूनच कागदोपत्री गैरव्यवहार होत असल्याचे सिद्ध होत असल्याचा दावा दत्ता जाधव यांनी केला आहे.
सदर प्रकरणांमधील गैरकारभाराची आणखी काही अतिशय गंभीर कागदपत्रे आता आपल्या हाती लागल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले आहे. ग्रामपंचायत अधिकारी आणि तत्कालीन सरपंच यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, या प्रमुख मागणीसाठी अहिल्यानगर येथील जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषणाची तयारी त्यांनी दर्शवली आहे.

