• Thu. Nov 5th, 2026

Mirrornews24

Marathi News

ज्येष्ठ छायाचित्रकार राजू शेख यांचा ‘रेडिओ नगर’वर विशेष संवाद!

ByMirror

Nov 5, 2026
वृत्तपत्र छायाचित्रकार राजू शेख

कॅमेऱ्याच्या लेन्समधून उलगडला वृत्तछायाचित्रकारितेचा प्रवास

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पत्रकारिता क्षेत्रात वृत्तपत्र छायाचित्रकाराचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असते. एखादी घटना शब्दांत मांडण्यापूर्वी ती आपल्या कॅमेऱ्यातून जिवंत करणारा छायाचित्रकार हा पत्रकारितेचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ असतो. अशाच छायाचित्रणाच्या माध्यमातून अनेक वर्षे पत्रकारितेची सेवा करणारे जुन्या पिढीतील ज्येष्ठ वृत्तपत्र छायाचित्रकार राजू शेख यांच्याशी ‘रेडिओ नगर 90.4 एफएम’च्या विशेष मुलाखतीत मनमोकळा संवाद साधण्यात आला आहे. हा कार्यक्रम शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2026 रोजी रात्री 9 वाजता ‘रेडिओ नगर 90.4 एफएम’वर प्रसारित होणार आहे.


‘लोकशाहीचा चौथा स्तंभ : प्रेस फोटोग्राफर’ या विशेष मुलाखतीच्या माध्यमातून राजू शेख यांनी आपल्या प्रदीर्घ जीवनप्रवासातील अनेक अनुभवांना उजाळा दिला. त्यांची मुलाखत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी घेऊन त्यांना विविध विषयांवर बोलते केले. वृत्तपत्र छायाचित्रणाची सुरुवात, त्या काळातील आव्हाने, बातमीसाठी घटनास्थळी पोहोचण्याची धडपड, योग्य क्षण टिपण्यासाठी घ्यावी लागणारी मेहनत आणि छायाचित्रकार म्हणून घडत गेलेला प्रवास अशा विविध विषयांवर त्यांनी आपले अनुभव मांडले.


एकेकाळी फिल्म रोल, निगेटिव्ह, डार्करूम आणि छायाचित्र विकसित करण्याच्या प्रक्रियेतून वृत्तपत्र छायाचित्रणाचा प्रवास सुरू होता. एका महत्त्वाच्या क्षणाचे छायाचित्र टिपण्यासाठी छायाचित्रकाराला प्रचंड संयम, निरीक्षणशक्ती आणि प्रसंगावधान राखावे लागत असे. आजच्या डिजिटल युगात मोबाईल, डिजिटल कॅमेरे, आधुनिक लेन्स आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे छायाचित्रणाचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. या बदलत्या छायाचित्रकलेचा प्रवास आणि जुन्या काळातील अनुभव यांची सांगड घालत राजू शेख यांनी आपले विचार व्यक्त केले.


काळ बदलला, तंत्रज्ञान बदलले, छायाचित्रणाची साधने बदलली; मात्र बातमीचा अचूक क्षण टिपण्याची दृष्टी, सामाजिक भान आणि छायाचित्रातून वास्तव मांडण्याची जबाबदारी आजही तितकीच महत्त्वाची आहे, या विषयावर त्यांनी संवाद साधला आहे. नव्या पिढीतील छायाचित्रकार आणि पत्रकारांसाठी हा संवाद निश्‍चितच प्रेरणादायी ठरणार आहे. जुन्या पिढीने अनुभवलेल्या पत्रकारितेच्या आठवणी आणि नव्या पिढीसमोर उभे असलेले आधुनिक तंत्रज्ञानाचे विश्‍व यांच्यातील दुवा साधणारी ही मुलाखत ठरणार आहे. ऑनलाइन रेडिओची मुलाखत एकण्यासाठी

https://centova87.shoutcastservices.com/proxy/nagar90/stream
ही लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *