• Fri. Nov 6th, 2026

Mirrornews24

Marathi News

जैन सोशल फेडरेशन संचलित दिवाळी फराळ महोत्सवाला नागरिकांचा प्रतिसाद

ByMirror

Nov 5, 2026
फराळ खरेदीसाठी नागरिकांच्या अक्षरश: लागल्या रांगा

फराळ खरेदीसाठी नागरिकांच्या अक्षरश: लागल्या रांगा


ना नफा, ना तोटा तत्त्वावर माफक दरात दर्जेदार फराळ उपलब्ध


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- दिवाळी म्हटले की घराघरांत फराळाची लगबग, खरेदीची धावपळ आणि विविध पदार्थ तयार करण्याची तयारी सुरू होते. मात्र, वाढती महागाई, वेळेची कमतरता आणि घरगुती जबाबदाऱ्यांमुळे महिलांसाठी दिवाळीचा फराळ तयार करणे अनेकदा मोठे आव्हान ठरते. अशा परिस्थितीत सर्वसामान्य नगरकरांची दिवाळी गोड करणारा जैन सोशल फेडरेशन संचलित भगवान महावीर भवन येथील दिवाळी फराळ महोत्सव नागरिकांच्या पसंतीस उतरला आहे. सलग 14 व्या वर्षी सुरू झालेल्या या महोत्सवाच्या उद्घाटनानंतर फराळ खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी झाली असून, अक्षरश: रांगा लागल्या आहेत.


स्टेशन रोडवरील भगवान महावीर भवन येथे आयोजित या महोत्सवात ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर दर्जेदार फराळ माफक दरात उपलब्ध करून देण्यात आला आहे. महागाई आणि दुष्काळाचे सावट असतानाही सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किमतीत स्वच्छ, आरोग्यदायी वातावरणात तयार केलेला फराळ उपलब्ध करून देण्याची परंपरा यंदाही कायम ठेवण्यात आली आहे. उद्घाटनानंतर नागरिकांनी विविध फराळ पदार्थांच्या खरेदीसाठी दालनात गर्दी केली.


या महोत्सवाचे सर्वाधिक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे महिलांची दिवाळीची धावपळ आणि ताण कमी होण्यास मिळणारी मदत. दिवाळीच्या दिवसांत घराची स्वच्छता, सजावट, पूजा, पाहुण्यांचे स्वागत आणि इतर कामांमध्ये महिलांचा बराच वेळ जातो. त्यातच फराळाचे विविध पदार्थ तयार करण्यासाठी लागणारा वेळ, मेहनत आणि खर्च यांची भर पडते. अशा वेळी तयार फराळ उपलब्ध असल्याने महिलांना मोठा दिलासा मिळत आहे. फराळ तयार करण्यासाठी लागणारा वेळ वाचतो, विविध साहित्य खरेदीचा खर्च आणि कष्ट कमी होतात. त्यामुळे कुटुंबीयांसोबत सणाचा आनंद घेण्यासाठी अधिक वेळ मिळतो.
या महोत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नागरिकांना आवश्‍यकतेनुसार आणि हव्या त्या प्रमाणात फराळ खरेदी करता येतो. घरातील सदस्यसंख्या, पाहुण्यांची ये-जा आणि गरज लक्षात घेऊन थोड्या किंवा अधिक प्रमाणात फराळ घेण्याची सुविधा असल्याने अनावश्‍यक खर्च आणि पदार्थांची नासाडी टाळता येते. एकाच ठिकाणी विविध प्रकारचे पदार्थ उपलब्ध होत असल्याने वेगवेगळ्या दुकानांमध्ये फिरण्याचीही गरज राहत नाही. त्यामुळे वेळ आणि पैशांची बचत होत असून, नोकरदार कुटुंबे, ज्येष्ठ नागरिक आणि व्यस्त गृहिणींसाठी हा महोत्सव सोयीचा ठरत आहे.


बुंदीचे लाडू, मसाला शेव, चिवडा, शंकरपाळे, सोनपापडी यांसह विविध प्रकारचे पारंपरिक दिवाळी फराळाचे पदार्थ येथे उपलब्ध आहेत. उच्च प्रतीचा कच्चा माल वापरून स्वच्छतेची विशेष काळजी घेत फराळ तयार करण्यात आला आहे. घरगुती चव, दर्जा आणि माफक दर यांचा समतोल साधल्यामुळे या महोत्सवाला दरवर्षी नागरिकांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे.
गेल्या 14 वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमाने नागरिकांचा विश्‍वास संपादन केला आहे. गेल्या वर्षी सुमारे 130 टन फराळाची विक्री झाली होती. मागणी वाढल्यामुळे यंदा 140 टन फराळ विक्रीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. गतवर्षी महोत्सवाच्या अखेरच्या टप्प्यात फराळाचा साठाही संपला होता. यंदाही उद्घाटनानंतर झालेली गर्दी पाहता नागरिकांमध्ये या महोत्सवाविषयी मोठी उत्सुकता असल्याचे दिसून येत असल्याची माहिती फराळ महोत्सवाचे संचालक मिलापचंद पटवा यांनी दिली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *