पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेचा आरोप; मुख्य निवडणूक आयुक्तांसह देशातील राज्यकर्त्यांना ‘क्रांतीची दिवाळी भेट’
अहिल्यानगरमध्ये 6 नोव्हेंबरला रणशिंग फुंकणार!
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सत्तेच्या माजात धुंद झालेल्या आणि लाल दिव्यांच्या गाड्यांमध्ये घोरणाऱ्या सुस्त प्रशासनाला सळो की पळो करून सोडण्यासाठी अहिल्यानगरची धूळ उडणार आहे! जगभर दीपोत्सवाचा उत्सव सुरू असताना, दुसरीकडे ‘पीपल्स हेल्पलाईन’ आणि ‘भारतीय जनसंसद’ या संघटनांच्या वतीने व्यवस्थेच्या छाताडावर पाय ठेवत आक्रमक आणि बंडखोरीची हाक देणारा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
6 नोव्हेंबर 2026 रोजी अहिल्यानगरच्या हुतात्मा स्मारकात, देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासह शासन-प्रशासनातील तमाम पदाधिकाऱ्यांना ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या कर्तव्यनिष्ठेच्या नखाची प्रतिकृती प्रतीकात्मक ‘दिवाळी भेट’ म्हणून जाहीरपणे सुपूर्द केली जाणार आहे!
महाराष्ट्राच्या मातीत बाणा दाखवणारा हा अधिकारी जेव्हा नवी मुंबईत महापालिका आयुक्त म्हणून रुजू होतो, तेव्हा तो ‘वॉक विथ कमिशनर’च्या माध्यमातून एसी कार्यालयातून बाहेर पडून थेट रस्त्यावर उतरतो आणि सामान्य माणसाचे अश्रू पुसतो. स्वातंत्र्योत्तर भारतातील प्रशासनात अशी लोकाभिमुखता आणि उत्तरदायित्वाची भावना आज पूर्णपणे हद्दपार झाली असून, आजची नोकरशाही आणि राज्यकर्ते म्हणजे फक्त सत्तेचे गुलाम बनले आहेत, असा प्रखर रोष दोन्ही संघटनांनी व्यक्त केला आहे.
“तुकाराम मुंढे यांच्यासारख्या कर्तव्यकठोर अधिकाऱ्याच्या नखाची सरही आजच्या एकाही पदाधिकाऱ्याला किंवा राज्यकर्त्याला आलेली नाही,” असा घणाघात करत आयोजकांनी प्रशासनाला उघडे पाडले आहे. पदाधिकाऱ्यांनी खुर्च्यांचे लाचार होण्यापेक्षा मुंढे यांच्या कार्यपद्धतीतून धडा घ्यावा, जनतेच्या हाकेला धावून जावे, वेळेत न्याय द्यावा आणि कायदा केवळ गरिबांसाठी नव्हे तर सर्वांसाठी समानतेने राबवावा, असे ठणकावून सांगण्यात आले आहे.
आयुष्य अगदी अल्प आहे; ते सत्तेची खाती भरण्यात घालवण्यापेक्षा लोकभक्ती, ज्ञानभक्ती, कर्मभक्ती, घटनात्मक नैतिकता आणि कायद्याचे राज्य या पाच तत्त्वांच्या आधारावर जनसेवेसाठी समर्पित करा, अशी मशाल पेटवणारी हाक या निमित्ताने संपूर्ण देशाच्या व्यवस्थेला दिली जाणार आहे! या अभिनव आंदोलनासाठी अशोक सब्बन, प्रकाश थोरात, ॲड. अमित थोरात, राहुल आढाव, बाळासाहेब पालवे, आनंद आढाव, शाहीर कान्हू सुंबे, अशोक भोसले, पोपट भोसले, वीर बहादुर प्रजापती, अभिमान शिंदे, बाबासाहेब भोसले आदी प्रयत्नशील आहेत.

