ना नफा, ना तोटा तत्त्वावर दर्जेदार फराळ उपलब्ध; महागाई आणि दुष्काळाचे सावट, तरीही फराळ माफक दरात!
जैन सोशल फेडरेशनच्या फराळ महोत्सवातून सर्वसामान्यांची दिवाळी गोड करण्याचे काम -आनंद भंडारी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सर्वसामान्यांपासून ते श्रीमंत कुटुंबांपर्यंत प्रत्येकाला दिवाळीच्या फराळाचा आनंद घेता यावा, या उद्देशाने जैन सोशल फेडरेशन संचलित स्टेशन रोड येथील भगवान महावीर भवन येथे सलग 14 व्या वर्षी दिवाळी फराळ महोत्सवाला प्रारंभ झाला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. महागाई आणि दुष्काळाचे सावट असतानाही ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर माफक दरात, स्वच्छ व आरोग्यदायी वातावरणात तयार केलेला दर्जेदार फराळ उपलब्ध करून देण्याचा उपक्रम यंदाही सुरू ठेवण्यात आला आहे.
या उद्घाटनप्रसंगी बडी साजन ओसवाल श्री संघाचे अध्यक्ष पेमराज बोथरा, सतीश (बाबुशेठ) लोढा, संतोष बोथरा, डॉ. विजय भंडारी, डॉ. प्रकाश कांकरिया, सुनील मालू, आनंदऋषीजी नेत्रालयाचे प्रशासकीय अधिकारी आनंद छाजेड, माणकचंद कटारिया, सतीश मुनोत (भोसरी), गिरीश गांधी, मिलापचंद पटवा, प्रकाश पटवा, अमित पटवा, रुपेश पटवा, आर्यन पटवा आदी उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी बोलताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी म्हणाले की, भगवान महावीर भवनातील फराळ महोत्सवात स्वच्छता आणि आरोग्याची काळजी घेऊन फराळाची निर्मिती केली जाते. दर्जेदार फराळ माफक दरात उपलब्ध करून देत सर्वसामान्यांची दिवाळी गोड करण्याचे काम पटवा परिवार करत आहे. सामाजिक बांधिलकीतून राबविण्यात येणारा हा उपक्रम कौतुकास्पद असून, महावीर भोजनालयाच्या कार्याचाही त्यांनी गौरव केला.
दिवाळी हा केवळ दिव्यांचा आणि आनंदाचा सण नसून माणसांना प्रेमाने जोडणारा उत्सव आहे. गेल्या 14 वर्षांपासून सातत्याने सुरू असलेला हा महोत्सव सामाजिक जिव्हाळा, विश्वास आणि सेवाभाव जपणारा उपक्रम ठरला आहे. नफ्याच्या स्पर्धेच्या काळातही सर्वसामान्यांना दर्जेदार फराळ उपलब्ध करून देणे ही समाजाप्रती असलेल्या बांधिलकीची भावना असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
बुंदीचे लाडू, मसाला शेव, चिवडा, शंकरपाळे, सोनपापडी यांसह विविध प्रकारचे दिवाळी फराळ नागरिकांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नगरकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे या उपक्रमाने 14 वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण केली असून, शहरासह जिल्ह्यातील विविध भागांतून या फराळाला मागणी असल्याचे आयोजकांनी सांगितले.
महोत्सवाच्या प्रास्ताविकात मिलापचंद पटवा यांनी या उपक्रमामागील भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, सर्वसामान्य नागरिकांना घरगुती चवीचा, स्वच्छतेची काळजी घेऊन तयार केलेला स्वादिष्ट फराळ सहज उपलब्ध व्हावा, या हेतूने महोत्सवाची संकल्पना सुरू करण्यात आली. यंदा दुष्काळाचे सावट आणि कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती असतानाही नागरिकांना परवडणाऱ्या दरात फराळ मिळावा, यासाठी ‘ना नफा, ना तोटा’ तत्त्वावर विक्री केली जात आहे. नगरकरांकडून मिळणारे प्रेम आणि प्रतिसाद हेच या उपक्रमाच्या यशाचे खरे बळ आहे. गेल्या वर्षी सुमारे 130 टन फराळाची विक्री झाली होती. अखेरच्या टप्प्यात फराळाचा साठाही संपला होता. यंदा 140 टन फराळ विक्रीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती पटवा यांनी दिली.
संतोष बोथरा यांनी पटवा परिवाराच्या सामाजिक योगदानाचे कौतुक केले. सर्वसामान्यांची दिवाळी गोड व्हावी, या उद्देशाने कमी दरात दर्जेदार फराळ उपलब्ध करून देण्याचे काम पटवा परिवार सातत्याने करत आहे. या कार्यात परिवाराची दुसरी पिढीही सेवाभावाने सहभागी झाली असून, घरगुती पद्धतीने तयार केलेल्या फराळाला शहरासह संपूर्ण जिल्ह्यातून मागणी मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.
उच्च प्रतीचा कच्चा माल वापरून स्वच्छ व आरोग्यदायी वातावरणात फराळ तयार करण्यात येत आहे. नगरकरांना चांगल्या दर्जाचा फराळ मिळावा यासाठी संपूर्ण टीम दिवसरात्र परिश्रम घेत आहे. नागरिकांच्या प्रेमामुळे 14 वर्षांपूर्वी सुरू झालेला हा उपक्रम यशस्वीपणे पुढे जात असल्याचे रुपेश पटवा आणि अमित पटवा यांनी सांगितले.

