• Fri. Oct 16th, 2026

Mirrornews24

Marathi News

‘जय माता दी’च्या जयघोषाने दुमदुमले सर्जेपुऱ्यातील राधा-कृष्ण मंदिर

ByMirror

Oct 16, 2026
माता की चौकीत भक्तीचा जागर!; सेवाप्रीत सोशल फाउंडेशनचा सामाजिक पुरस्काराने गौरव

माता की चौकीत भक्तीचा जागर!; सेवाप्रीत सोशल फाउंडेशनचा सामाजिक पुरस्काराने गौरव


महाकालचे तांडव, महाकालीचा अवतार अन्‌ राक्षसवधाचा जिवंत देखावा; पंजाबी ढोलच्या तालावर महिलांचा रास गरबा


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सर्जेपुऱ्यातील पंजाबी सनातन धर्मसभेच्या राधा-कृष्ण मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘माता की चौकी’ कार्यक्रमात भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा अनोखा संगम पाहायला मिळाला. देवीच्या भक्तिगीतांनी मंत्रमुग्ध झालेले भाविक, महाकालचे तांडव नृत्य, महाकाली देवीचे आगमन आणि राक्षसवधाचा जिवंत देखावा, तसेच पंजाबी ढोलच्या तालावर रंगलेला रास गरबा अशा विविध कार्यक्रमांनी मंदिर परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला. शीख आणि पंजाबी समाजबांधवांसह महिला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवीचा जागर केला.
माता की चौकीच्या कार्यक्रमात महाकालचे तांडव नृत्य, महाकाली देवीचे आगमन आणि राक्षसवधाचा जिवंत देखावा सादर करण्यात आला. या देखाव्याने उपस्थित भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. देवीच्या विविध रूपांचे दर्शन घडविणाऱ्या या सादरीकरणाला भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी देवीच्या वेशभूषेत सजलेल्या चिमुकल्या त्रिशा ओबेरॉय हिचे कार्यक्रमस्थळी आगमन होताच भाविकांनी ‘जय माता दी’चा एकच जयघोष केला. देवीच्या रूपातील तिच्या देखण्या सादरीकरणाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.


शिर्डी येथील नवदुर्गा जागरण ग्रुपच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात दिलप्रीतकौर बतरा यांनी देवीची विविध भक्तिगीते सादर केली. देवीच्या एकाहून एक सरस भक्तिगीतांनी मंदिर परिसर दुमदुमून गेला. वाद्यांच्या सुरेल साथीने सादर झालेल्या भक्तिगीतांमध्ये भाविक तल्लीन झाले होते. देवीच्या महिम्याचे वर्णन करणाऱ्या गीतांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. रात्री उशिरापर्यंत रंगलेल्या या कार्यक्रमात भाविकांनी भक्तिगीतांचा मनमुराद आनंद लुटला. देवीच्या जयघोषाने वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते. श्रद्धा, भक्ती आणि सामूहिक सहभागातून साजऱ्या झालेल्या या सोहळ्याने नवरात्रोत्सवाचा उत्साह अधिकच वाढविला.


कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात पंजाबी ढोलच्या ठेक्यावर महिलांनी रास गरबा नृत्य सादर केले. ढोलच्या तालावर थिरकणाऱ्या महिलांनी कार्यक्रमात विशेष रंगत आणली. भक्तिगीतांचा गजर, ढोलचा निनाद आणि देवीचा जयजयकार यामुळे संपूर्ण परिसर उत्साहाने भारून गेला होता. महिलांसह उपस्थित भाविकांनी या सोहळ्याचा मनमुराद आनंद घेतला.
पंजाबी सनातन धर्मसभेचे ट्रस्टचे अध्यक्ष राकेश गुप्ता आणि सर्व विश्‍वस्तांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे यजमान संजय धुप्पड परिवाराच्या वतीने जय धुप्पड आणि गायत्री धुप्पड यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. आरतीनंतर भाविकांना भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले. भंडाऱ्याने या भक्तिमय सोहळ्याची सांगता झाली.
राधा-कृष्ण मंदिरातील नवरात्रोत्सवाची सांगता सोमवारी, दि. 19 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.30 वाजता महिला भजन मंडळीच्या उपस्थितीत पूर्णाहुती यज्ञाने होणार आहे. त्यानंतर मंगळवारी, दि. 20 ऑक्टोबर रोजी समाजबांधवांच्या उपस्थितीत दसरा सण साजरा करण्यात येणार आहे.


–—
सेवाप्रीत सोशल फाउंडेशनचा सामाजिक पुरस्काराने गौरव
गेल्या दहा वर्षांपासून सेवाप्रीत सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून उपेक्षित व दुर्लक्षित घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, महिला सक्षमीकरण आणि दुर्बल घटकांना आधार देण्याचे महत्त्वपूर्ण सामाजिक कार्य सुरू आहे. या कार्याची दखल वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डने घेतली असून, संस्थेच्या कार्याची नोंद करण्यात आली आहे. या उल्लेखनीय कार्याबद्दल सेवाप्रीत सोशल फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा जागृती ओबेरॉय आणि महिला सदस्यांचा राधा-कृष्ण मंदिर ट्रस्टच्या वतीने सामाजिक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *