देवीची आरती करुन शांतता, समृद्धी अन् पावसासाठी प्रार्थना!
देवीच्या भक्तीतून सकारात्मक ऊर्जा मिळते -दिलीप टिपरसे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नवरात्रोत्सवाच्या भक्तिमय वातावरणात एमआयडीसी नवनागापूर येथील श्री रेणुका माता देवस्थान मंदिरात शहर पोलीस उपाधीक्षक दिलीप टिपरसे यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. यावेळी त्यांनी देवीच्या चरणी नतमस्तक होत समाजात शांतता व समृद्धी नांदावी, तसेच दुष्काळाचे सावट दूर होऊन सर्वत्र समाधानकारक पाऊस पडावा, अशी प्रार्थना केली. भक्ती, श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जेचा संदेश देणाऱ्या या धार्मिक सोहळ्याला देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
एमआयडीसी नवनागापूर येथील श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्टच्या वतीने दरवर्षी नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदाही नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. धार्मिक कार्यक्रमांसोबतच भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठीही ट्रस्टच्या वतीने विशेष नियोजन करण्यात आले आहे.
पोलीस उपाधीक्षक दिलीप टिपरसे यांनी मंदिर परिसराला भेट देऊन नवरात्रोत्सवाच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या व्यवस्थेची पाहणी केली. भाविकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या सुविधा, धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन आणि आरोग्यविषयक उपक्रमांची माहिती त्यांनी जाणून घेतली. देवस्थान ट्रस्टने श्रद्धा आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर समन्वय साधत केलेल्या नियोजनाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. धार्मिक उत्सवांच्या माध्यमातून भाविकांना अध्यात्मिक समाधान मिळण्याबरोबरच सामाजिक जाणीवही जपले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी बोलताना पोलीस उपाधीक्षक दिलीप टिपरसे म्हणाले की, देवीच्या भक्तीतून सकारात्मक ऊर्जा मिळते. ही ऊर्जा माणसाला आपले कर्तव्य अधिक निष्ठेने पार पाडण्यासाठी प्रेरणा देते. नवरात्रोत्सव हा श्रद्धा, भक्ती आणि शक्तीचा उत्सव असून, या काळात पोलीस दलालाही आपले कर्तव्य बजावण्यासाठी नवी स्फूर्ती मिळते. उत्सवाच्या काळात भाविकांची सुरक्षितता राखणे, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे आणि नागरिकांना शांततेत धार्मिक कार्यक्रमांचा आनंद घेता यावा, यासाठी पोलीस दल प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. तर नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने त्यांनी भाविकांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर भोर, उपाध्यक्ष साहेबराव भोर, सचिव दत्तात्रय विटेकर, खजिनदार एकनाथ वाघ, विश्वस्त राजू भोर, विष्णू भोर, किरण सप्रे, गणेश कातोरे, महेश सप्रे आणि सचिन कोतकर आदी उपस्थित होते.

