• Fri. Oct 16th, 2026

Mirrornews24

Marathi News

हरदिन मॉर्निंग ग्रुपतर्फे भिंगारमध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात

ByMirror

Oct 16, 2026
स्वच्छता अभियानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश!

भगवान बुद्धांना नमन करुन बाबासाहेबांना अभिवादन, स्वच्छता अभियान आणि वृक्षारोपणाने सामाजिक संदेश


स्वच्छता अभियानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश!


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भगवान गौतम बुद्धांचा समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि मैत्रीचा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने भिंगार येथील हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. बुधवारी (दि. 14 ऑक्टोबर) भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भगवान गौतम बुद्धांच्या पूर्णाकृती पुतळ्यावर पुष्पवृष्टी करून आणि मेणबत्त्या प्रज्वलित करून अभिवादन करण्यात आले. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथील दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांसह बौध्द धम्माचा स्विकार केला. या आठवणींना उजाळा देऊन बाबासाहेबांचा जयघोष करण्यात आला.


या कार्यक्रमाला हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, संजय भिंगारदिवे, विकास भिंगारदिवे, जहीर सय्यद, ताराचंद ठोकळ, अशोक पराते, सर्वेश सपकाळ, रमेश वराडे, दीपक घोडके, विलास आहेर, रतन मेहेत्रे, अभिजीत सपकाळ, सखाराम अळकुटे, योगेश चौधरी, जालिंदर अळकुटे, सुधीर कपाळे, दशरथ मुंडे, अविनाश पोतदार, सरदारसिंग परदेशी, मुन्ना वागस्कर, निजाम पठाण, अविनाश जाधव, रामनाथ गर्जे, जोगिंदरसिंग, उमाशंकरसिंग पंडित, दिलीपराव ठोकळ, इंजि. अनिल सोळसे, सुहास देवराईकर, राजू कांबळे, दीपक घाडगे, मनोहर दरवडे, संतोष लुनिया, दीपक अमृत, विशाल भामरे, मनोज नागपुरे आदी उपस्थित होते.


कार्यक्रमाच्या निमित्ताने बुद्धवंदना, स्वच्छता अभियान आणि वृक्षारोपण असे सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. धम्मचक्र प्रवर्तन दिन हा केवळ धार्मिक किंवा ऐतिहासिक दिवस नसून, तो सामाजिक परिवर्तन, मानवी मूल्ये आणि समतेच्या विचारांचा जागर करणारा दिवस आहे. भगवान बुद्धांनी दिलेला करुणा, प्रज्ञा आणि मैत्रीचा संदेश तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला दिलेली समता आणि स्वाभिमानाची शिकवण आचरणात आणण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी धम्ममित्र संजय भिंगारदिवे आणि विकास भिंगारदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली त्रिशरण व पंचशील घेण्यात आले.
यानंतर भगवान गौतम बुद्धांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पवृष्टी करून मेणबत्त्या प्रज्वलित करण्यात आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. बुद्ध आणि बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा जपत समाजात समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाची भावना दृढ करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचाही संदेश देण्यात आला.


यावेळी बोलताना संजय भिंगारदिवे म्हणाले की, “14 ऑक्टोबर हा भारतीय इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. नागपूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माचा स्वीकार केला. हा केवळ धर्मांतराचा प्रसंग नव्हता, तर तो समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि मानवी प्रतिष्ठेवर आधारित सामाजिक परिवर्तनाचा ऐतिहासिक टप्पा होता. भगवान गौतम बुद्धांचा धम्म हा कल्याण, करुणा आणि मैत्रीचा मार्ग आहे. प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळावा, समाजात भेदभाव राहू नये आणि सर्वांना समान संधी मिळाव्यात, या विचारांतून बाबासाहेबांनी धम्माचा स्वीकार केला. त्यांनी नेहमीच संपूर्ण भारतीय समाजाच्या कल्याणाचा विचार केला. त्यामुळे बुद्ध आणि बाबासाहेबांचे विचार केवळ एका समाजापुरते मर्यादित नसून, ते संपूर्ण मानवजातीला दिशा देणारे असल्याचे त्यांनी सांगितले.


हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ यांनीही सामाजिक एकता, बंधुभाव आणि समाजहिताच्या उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, धम्मचक्र प्रवर्तन दिन हा आपल्याला समता, बंधुता आणि मानवतेची मूल्ये जपण्याची प्रेरणा देतो. भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखविलेल्या मार्गावर चालताना समाजातील प्रत्येक घटकाचा सन्मान करणे आवश्‍यक आहे. स्वच्छता अभियान आणि वृक्षारोपणासारख्या उपक्रमांतून समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी पार पाडता येते. महापुरुषांचे विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा कार्यक्रमांची आवश्‍यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
विकास भिंगारदिवे यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बुद्धांच्या करुणेचा, मैत्रीचा आणि विवेकाचा मार्ग स्वीकारण्याबरोबरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समताधिष्ठित समाजनिर्मितीच्या विचारांचा प्रसार करण्याचे आवाहन यावेळी केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *