जंतरमंतरपासून गावोगाव लोकशाहीच्या रक्षणासाठी उभे राहणाऱ्यांचा होणार गौरव; संविधाननिष्ठ ‘संपूर्ण क्रांती’चा लोकसंकल्प
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- लोकशाही आणि भारतीय संविधानाच्या रक्षणासाठी शांततामय व घटनात्मक मार्गाने संघर्ष करणाऱ्या नागरिकांना ‘लोकशाही संविधान सैनिक’ म्हणून जनसन्मान देण्याची संकल्पना पीपल्स हेल्पलार्इन व भारतीय जनसंसदेच्या माध्यमातून ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. कारभारी गवळी यांनी मांडली आहे. ‘वुई द पीपल ऑफ इंडिया आम्ही भारताचे लोक’ या लोकसंकल्पातून अशा नागरिकांचे योगदान पिढ्यान्पिढ्या स्मरणात ठेवावे आणि त्यांच्या कार्यातून संविधाननिष्ठ ‘संपूर्ण क्रांती’ची प्रेरणा देशभर पोहोचावी, अशी या उपक्रमाची व्यापक भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.
दिल्लीतील जंतरमंतरपासून शहरांच्या गल्लीबोळांपर्यंत आणि गावांच्या वाड्यावस्त्यांपर्यंत लोकशाहीच्या संरक्षणासाठी आवाज उठविणारे नागरिक या जनसन्मानाच्या केंद्रस्थानी असतील. निवडणूक प्रक्रियेची निष्पक्षता, लोकशाही संस्थांची स्वायत्तता, नागरिकांचे अधिकार आणि सार्वजनिक सत्तेचे उत्तरदायित्व यांसाठी अहिंसक आंदोलन, सत्याग्रह आणि लोकजागृती करणाऱ्यांच्या योगदानाचा गौरव करण्याचा संकल्प या संकल्पनेतून व्यक्त करण्यात आला आहे.
‘संपूर्ण क्रांती’ म्हणजे नागरिकांच्या विचारात, आचरणात, सामाजिक संबंधांत आणि शासनव्यवहारात संविधानिक मूल्ये रुजविण्याचा सततचा लोकप्रयत्न. सत्तेवरील व्यक्ती बदलण्याबरोबरच सत्तेच्या वापरातील मनमानी, भेदभाव, भ्रष्टाचार आणि जनतेप्रती असलेली उदासीनता दूर करण्यासाठी जागरूक नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये प्रत्येकाच्या प्रत्यक्ष जीवनाचा आणि सार्वजनिक निर्णयांचा आधार बनावीत, असा या लोकसंकल्पाचा आशय आहे.
सार्वजनिक संस्थांना आणि पदाधिकाऱ्यांना प्रश्न विचारणे, त्यांच्या निर्णयांची चिकित्सा करणे आणि पारदर्शकतेची मागणी करणे ही जागरूक नागरिकांची लोकशाहीतील महत्त्वाची भूमिका आहे. लोकहितासाठी जबाबदारीने आवाज उठविणाऱ्या नागरिकांच्या योगदानाची समाजाने दखल घ्यावी, असे या उपक्रमातून अधोरेखित करण्यात आले आहे. या जनसन्मानाचा आधार नागरिकांची शांततामय कृती, सत्यनिष्ठा आणि संविधानाशी निष्ठा असेल. आंदोलनातील योगदानाचे मूल्यमापन जात, धर्म, पक्ष किंवा सामाजिक प्रतिष्ठेवरून करण्याऐवजी नागरिकांचे अधिकार आणि सार्वजनिक हित यांसाठी केलेल्या कार्यावरून व्हावे, अशी या संकल्पनेची भूमिका आहे.
ॲड. कारभारी गवळी यांच्या ‘आत्मधारणालय स्वशासन’ या विचाराशी जोडून पाहता, संविधाननिष्ठ संपूर्ण क्रांतीसाठी प्रत्येक नागरिकाने स्वतःच्या साठवलेल्या धारणा, पूर्वग्रह आणि सवयींचीही चिकित्सा करणे आवश्यक ठरते. ‘ओळखातपासाबदला’ या प्रक्रियेतून द्वेष, भेदभाव आणि अंधानुकरणाला प्रश्न विचारत विवेकपूर्ण ‘RECONSCIO’ स्वशासन विकसित करणे, ही व्यक्तीपासून समाजापर्यंत परिवर्तन घडविण्याची दिशा आहे. समाजाकडून अपेक्षित असलेली संविधाननिष्ठा स्वतःच्या आचरणात आणण्याचा संकल्पही यात अभिप्रेत आहे.
‘लोकशाही संविधान सैनिक’ हे नागरिकांकडून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या जनसन्मानाचे संबोधन असेल; त्यातून कोणताही शासकीय दर्जा किंवा लाभ अभिप्रेत नाही. येथे ‘सैनिक’ हा शब्द संविधानिक मूल्यांचे अहिंसक रक्षण करणाऱ्या जागरूक नागरिकाच्या अर्थाने वापरण्यात आला आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांचा त्याग आणि संघर्ष देशाच्या सामूहिक स्मृतीत जतन केला जातो. त्याच प्रेरणेने आज लोकशाही, संविधान आणि मानवी प्रतिष्ठेसाठी उभे राहणाऱ्या नागरिकांचे कार्यही नोंदविले जावे आणि पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविले जावे, अशी या जनसन्मानामागील भावना आहे. स्थानिक पातळीवरील संघर्षातील सामान्य नागरिकांचे योगदान उजेडात आणल्यास लोकशाही रक्षणाच्या कार्याला व्यापक सामाजिक पाठबळ मिळू शकेल.
भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेतील ‘आम्ही भारताचे लोक’ ही भावना नागरिकांना लोकशाहीच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारण्याची प्रेरणा देते. प्रत्येक गाव, वस्ती आणि शहरात संविधानिक मूल्यांवरील संवाद वाढवावा, नागरिकांच्या हक्कांबरोबर कर्तव्यांची जाणीव निर्माण करावी आणि सार्वजनिक सत्तेकडून उत्तरदायित्वाची मागणी करत राहावे, असे व्यापक आवाहन या लोकसंकल्पातून करण्यात येत आहे. लोकशाहीच्या रक्षणासाठी उभे राहणाऱ्या नागरिकांचा जनसन्मान हा त्यांच्या कार्याची सार्वजनिक दखल घेण्याचा आणि इतरांना सहभागासाठी प्रेरित करण्याचा प्रयत्न आहे. जागरूक नागरिक, संविधाननिष्ठ आचरण आणि उत्तरदायी सार्वजनिक सत्ता यांतून ‘संपूर्ण क्रांती’चा लोकसंकल्प प्रत्यक्षात आणण्याची दिशा या उपक्रमाने मांडली आहे. या अभियानासाठी अशोक सब्बन, प्रकाश थोरात, ॲड. अमित थोरात, राहुल आढाव, बाळासाहेब पालवे, आनंद आढाव, अशोक भोसले, पोपट भोसले, वीर बहादुर प्रजापती, शाहीर कान्हू सुंबे, अभिमान शिंदे, बाबासाहेब भोसले, अमित थोरात आदी प्रयत्नशील आहेत.

