• Wed. Sep 30th, 2026

Mirrornews24

Marathi News

जमिनीच्या वादातून वृद्ध शेतकऱ्याला जीवे मारण्याची धमकी?; पोलीस अधीक्षकांकडे संरक्षणाची मागणी

ByMirror

Sep 30, 2026
तलाठ्यासह संबंधितांविरुद्ध चौकशी व गुन्हा दाखल करण्याची मागणी

हक्कसोडपत्रानंतरही जमीन विक्री केल्याचा आरोप; 70 वर्षीय शेतकऱ्याची पोलिसांकडे धाव


तलाठ्यासह संबंधितांविरुद्ध चौकशी व गुन्हा दाखल करण्याची मागणी


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नांदूर विहिरे (ता. शेवगाव) येथील गट क्रमांक 16/5 मधील जमिनीच्या हक्क व विक्री व्यवहारावरून वाद निर्माण झाला असून, या प्रकरणात आपली व आपल्या पत्नीची फसवणूक करून जमिनीवर बेकायदेशीर दावा करण्यात आल्याचा आरोप 70 वर्षीय शेतकरी रमाजी कोंडीबा वाकडे यांनी केला आहे. तसेच जमिनीबाबत महसूल अथवा पोलिसांकडे तक्रार करू नये म्हणून काही व्यक्तींकडून रात्री-अपरात्री घरी येऊन शिवीगाळ व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. याबाबत वाकडे यांनी नुकतेच पोलीस अधीक्षक व शेवगाव पोलीस स्टेशनला निवेदनाद्वारे तक्रार करून स्वतःसह पत्नीला पोलिस संरक्षण देण्याची मागणी केली आहे.


वाकडे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, मौजे नांदूर विहिरे येथील गट क्र. 16/5 मध्ये त्यांचा हक्क असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. संबंधित जमिनीबाबत हौसाबाई भिमा साळवे, रुख्मीनी बाबासाहेब इंगळे तसेच मयत जगन्नाथ कोंडीबा वाकडे यांचे वारस यांनी हक्कसोडपत्र दस्त क्र. 1172/2016 अन्वये आपला कायदेशीर हक्क व हिस्सा वाकडे यांच्या हक्कात कायमस्वरूपी सोडून दिल्याचा दावा करण्यात आला आहे.


या हक्कसोडपत्रानंतर संबंधित क्षेत्राची नोंद त्यांच्या नावासमोर होणे अपेक्षित होते, असा वाकडे यांचा दावा आहे. हौसाबाई साळवे यांच्या हिश्‍श्‍याचे 32.20 आर, रुख्मीनीबाई यांच्या हिश्‍श्‍याचे 32.20 आर तसेच मयत जगन्नाथ वाकडे यांच्या वारसांचा 23 आर हिस्सा, असे एकूण 87.40 आर क्षेत्र आणि त्यांचे स्वतःचे 32.20 आर क्षेत्र मिळून एकूण 1 हेक्टर 19.60 आर क्षेत्र त्यांच्या नावासमोर नोंदविण्याची मागणी त्यांनी केली होती. मात्र फेरफार नोंद क्र. 2205 नुसार ही नोंद करण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तत्कालीन तलाठी यांनी गट क्र. 16/5 च्या 7/12 उताऱ्यावर चुकीच्या पद्धतीने क्षेत्र नोंदवून आपले क्षेत्र कमी दाखविल्याचा आरोपही वाकडे यांनी निवेदनात केला आहे. त्यामुळे महसूल अभिलेखातील नोंदींची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.


दरम्यान, याच जमिनीच्या व्यवहारासंदर्भात साखरबाई भाऊसाहेब जावळे आणि लताबाई अशोक जावळे यांनी आपल्या मालकीहक्कापेक्षा अधिक क्षेत्राची विक्री केल्याचा आरोप वाकडे यांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, लताबाई अशोक जावळे यांच्याकडे प्रत्यक्षात मर्यादित क्षेत्राचा वारसाहक्क असताना त्यापेक्षा अधिक क्षेत्र कोयना स्वप्नील पंडीत व रंजना प्रकाश पंडीत यांना विक्री करण्यात आले. या व्यवहारासाठी 6 एप्रिल 2026 रोजी विक्री दस्त करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले आहे. आपल्या हक्कात यापूर्वीच आलेल्या क्षेत्रावर पुन्हा विक्री व्यवहार करण्यात आल्याने आपली फसवणूक झाल्याचा आरोप वाकडे यांनी केला आहे. या व्यवहाराची चौकशी करून संबंधितांविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील लागू तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.


जमिनीच्या वादाबाबत तक्रार करू नये म्हणून संबंधितांकडून संगनमताने दबाव आणला जात असल्याचा आरोप रमाजी वाकडे यांनी केला आहे. ‘तुम्ही दोघेही वृद्ध झाला आहात, तुमचा मुलगा मयत झाला आहे आणि मुली त्यांच्या सासरी आहेत. त्यामुळे तुमच्या जमिनीची आता तुम्हाला गरज नाही. जमिनीबाबत तक्रार केली तर तुम्हाला व तुमच्या पत्नीला जिवंत ठेवणार नाही,’ अशा स्वरूपाच्या धमक्या दिल्या जात असल्याचे वाकडे यांनी निवेदनात म्हटले आहे. तसेच रात्री-अपरात्री घरी येऊन शिवीगाळ केली जात असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. संबंधितांकडून आपल्या कुटुंबाच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाल्याचे सांगत वाकडे यांनी पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली आहे.


या संपूर्ण प्रकरणात गट क्र. 16/5 च्या 7/12 उताऱ्यावरील नोंदी, फेरफार नोंद क्र. 2205, 2016 मधील हक्कसोडपत्र तसेच 2026 मधील विक्री व्यवहार यांची स्वतंत्र व सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच जमीन वादाच्या पार्श्‍वभूमीवर धमकी दिल्याच्या आरोपांचीही पोलिसांनी तातडीने चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी वाकडे यांनी केली आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *