• Wed. Sep 30th, 2026

Mirrornews24

Marathi News

चार पिढ्यांपासून कसलेल्या वनजमिनींच्या हक्कासाठी गांधी जयंतीदिनी ‘7ई-12ई पेरणी सत्याग्रह’

ByMirror

Sep 30, 2026
जुन्या पेन्शनसाठी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा एल्गार;

‘काळी आई’च्या हक्कासाठी वाळुंजला वनहक्क शेतकरी मैदानात; वनहक्क शेतकऱ्यांचा 2 ऑक्टोबरला वाळुंजमध्ये सत्याग्रह


अभिलेखांत जमीनहक्क नोंदविण्याची मागणी


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- चार पिढ्यांपासून ताब्यात असलेल्या व कसत असलेल्या वनजमिनींवरील हक्क मान्य करून संबंधित सरकारी अभिलेखांत त्यांची नोंद करावी, या मागणीसाठी वाळुंज (ता. नगर) येथील वनहक्क शेतकरी व त्यांचे कुटुंबीय महात्मा गांधी जयंतीनिमित्त 2 ऑक्टोबर रोजी ‘7ई आणि 12ई पेरणी सत्याग्रह’ करणार आहेत. दुपारी 12 वाजता गावातील गट क्र. 175 मधील संबंधित वनजमिनीवर हा सत्याग्रह करण्यात येणार आहे.
‘काळी आई मुक्ती आंदोलन’च्या वतीने महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांना 24 सप्टेंबर रोजी निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनातून वनहक्क शेतकऱ्यांच्या प्रलंबित दाव्यांचा तातडीने निपटारा करून त्यांचे जमीनहक्क अभिलेखांत नोंदविण्याची मागणी करण्यात आली आहे. आंदोलनाचे निमंत्रक म्हणून आसाराम सातपुते आणि हिरामण गायकवाड यांनी आंदोलनासाठी पुढाकार घेतला आहे.


वाळुंज परिसरातील आदिवासी तसेच इतर पारंपरिक वननिवासी शेतकरी अनेक पिढ्यांपासून संबंधित वनजमिनी कसत आहेत. गेल्या चार पिढ्यांपासून या जमिनींचा ताबा संबंधित कुटुंबांकडे असून, शेतकरी या जमिनींची नियमित मशागत करून त्यावर पिके घेत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या जमिनीवरच अनेक कुटुंबांची उपजीविका अवलंबून असल्याने वनजमिनीवरील हक्काचा प्रश्‍न त्यांच्या आर्थिक स्थैर्याबरोबरच पुढील पिढ्यांच्या भवितव्याशी जोडलेला असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.


वनहक्क कायदा, 2006 अंतर्गत पात्र दाव्यांचा निर्णय घेऊन संबंधित शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीवरील हक्क मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे. काही आदिवासी शेतकऱ्यांना वनहक्क कायद्यांतर्गत जमिनीचे हक्क देण्यात आले असले, तरी इतर पात्र शेतकऱ्यांचे दावे अद्याप प्रलंबित असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यापूर्वी शासनाकडून देण्यात आलेले पट्टे तसेच सरकारी नोंदी उपलब्ध असल्याचा दावाही आंदोलनकर्त्यांनी केला आहे.


जिल्हाधिकारी स्तरावर काही प्रकरणे प्रलंबित असून, विविध तांत्रिक कारणांमुळे प्रत्यक्ष ताबा असतानाही संबंधित शेतकऱ्यांचे हक्क अभिलेखांत नोंदविण्याची प्रक्रिया रखडल्याची तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांचा ताबा कायम ठेवून त्यांच्या पात्र दाव्यांवर कायद्यानुसार तातडीने निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
‘7ई व 12ई’ अभिलेखांत आवश्‍यक नोंदी कराव्यात, ताबा कायम करावा आणि पात्र वनहक्क दाव्यांना मान्यता द्यावी, या सत्याग्रहाच्या प्रमुख मागण्या आहेत. पिढ्यान्‌पिढ्या ज्या जमिनीवर कुटुंबे शेती करत आहेत, त्या जमिनीवरील हक्काला अधिकृत अभिलेखांत स्थान मिळावे, याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ‘7ई आणि 12ई पेरणी’ ही प्रतीकात्मक कृती करण्यात येणार आहे.


महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी सत्याग्रहाच्या माध्यमातून अहिंसक मार्गाने आपल्या मागण्या प्रशासनापुढे मांडण्याचा निर्णय वनहक्क शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांनी घेतला आहे. 2 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता गट क्र. 175 मधील संबंधित वनजमिनीवर शेतकरी कुटुंबीयांसह एकत्र येणार असून, प्रलंबित वनहक्क प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्याची मागणी करण्यात येणार आहे. चार पिढ्यांपासून जमीन कसणाऱ्या कुटुंबांना त्यांच्या हक्कांसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागू नये, पात्र दाव्यांची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जमीनहक्क अभिलेखांत नोंदवावेत आणि प्रत्यक्ष जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण करावे, अशी भूमिका ‘काळी आई मुक्ती आंदोलन’ने निवेदनातून मांडण्यात आली आहे. या आंदोलनासाठी ॲड. कारभारी गवळी, सयाजी गायकवाड, जगन्नाथ गुंजाळ, आसाराम बर्डे, बारीकराव गायकवाड आदी प्रयत्नशील आहेत.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *