महिला सक्षमीकरणासाठी संघटितपणे काम करण्याचा पदाधिकाऱ्यांचा निर्धार
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षामध्ये अहिल्यानगर शहरासह श्रीगोंदा तालुक्यातील महिलांनी जाहीर प्रवेश केला. पक्षाची ध्येयधोरणे, सामाजिक न्यायाची भूमिका आणि महिला सक्षमीकरणाच्या उपक्रमांवर विश्वास व्यक्त करत या महिलांनी रिपाइंमध्ये प्रवेश केला. रिपाइंचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के आणि महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षा ज्योती पवार यांनी नव्याने पक्षात प्रवेश केलेल्या महिलांचे स्वागत करून त्यांना पुढील सामाजिक व संघटनात्मक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या प्रवेशामुळे शहरासह श्रीगोंदा तालुक्यात पक्षाच्या महिला आघाडीला बळ मिळणार असून, आगामी काळात महिलांच्या प्रश्नांवर अधिक प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. महिला बचत गट, रोजगार, शिक्षण, आरोग्य, सुरक्षितता, शासकीय योजनांचा लाभ तसेच महिलांच्या सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणासाठी संघटनेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प महिलांनी केला. यावेळी पल्लवी घोडके, शशिकला कांबळे, मनीषा गायकवाड, शीतल जाधव, जया जाधव, अनिता साळवे आदी महिलांनी रिपाइंमध्ये जाहीर प्रवेश केला.
याप्रसंगी संपदा म्हस्के, शीतल नाटिकर, मनीषा गायकवाड, संजना गायकवाड, रेश्मा जाधव, गुलाम शेख, विजय शिरसाठ, अजीम खान, लकी वाघमारे, स्वप्नील साठे, विल्सन रुकडीकर, जावेद सय्यद, हुसेन चौधरी आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
रिपाइंचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के म्हणाले की, “रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) हा सामाजिक न्याय आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी काम करणारा पक्ष आहे. महिलांचा राजकीय, सामाजिक आणि आर्थिक सहभाग वाढणे ही काळाची गरज आहे. शहरासह श्रीगोंदा तालुक्यातील महिलांनी पक्षावर विश्वास ठेवून प्रवेश केल्याने संघटनेला निश्चितच बळ मिळाले आहे. नव्याने पक्षात आलेल्या प्रत्येक महिला भगिनीला संघटनेमध्ये योग्य जबाबदारी देऊन त्यांच्या नेतृत्वगुणांना वाव देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षा ज्योती पवार म्हणाल्या की, आज विविध भागांतील महिलांनी रिपाइंमध्ये प्रवेश करून सामाजिक आणि संघटनात्मक कार्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. हा केवळ पक्षप्रवेश नसून महिलांनी आपल्या हक्कांसाठी आणि समाजातील प्रश्नांसाठी पुढे येण्याचा घेतलेला निर्णय आहे. महिलांनी आपल्या समस्या मांडण्यासाठी आणि त्यावर उपाययोजनांसाठी संघटित होणे गरजेचे आहे. महिलांच्या शिक्षणापासून रोजगारापर्यंत, आरोग्यापासून सुरक्षिततेपर्यंत आणि शासनाच्या विविध योजनांपासून सामाजिक न्यायाच्या प्रश्नांपर्यंत अनेक विषयांवर काम करण्याची आवश्यकता असून, यासाठी रिपाईची महिला आघाडी प्रयत्नशील असल्याचे त्या म्हणाल्या.

