धनश्री सुजय विखे यांच्या हस्ते सभामंडपाचे लोकार्पण; समाजसेवकांचा विशेष सत्कार
इतिहास न विसरता, धर्मासाठी बलिदानाचा वारसा पुढे घेऊन जावा -आ. संग्राम जगताप
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- तारकपूर येथील अमृतवेला बाबा श्रीचंद महाराज गुरुद्वारा येथे बाबा श्रीचंद महाराज गुरुपुरब सोहळा विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांनी उत्साहात पार पडला. दोन दिवसीय या सोहळ्यात आरती, गुरबाणी कीर्तन, शब्द, आनंद साहेब, अरदास, हुकमनामा तसेच गुरू का लंगर आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यास समाजबांधव, महिला वर्ग आणि भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
गुरुपुरब सोहळ्याच्या निमित्ताने गुरुद्वारा परिसरात भाविकांच्या सोयीसाठी माजी खासदार डॉ. सुजय राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या सभामंडपाचे लोकार्पण सोमवारी (दि. 21 सप्टेंबर) सौ. धनश्री सुजय विखे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संग्राम जगताप, अमोल गाडे, सुप्रिया धनंजय जाधव, अमृतवेला बाबा श्रीचंद महाराज गुरुद्वाराच्या नवनिर्वाचित अध्यक्षा वीराजी वाही, उपाध्यक्ष राजेंद्र कंत्रोड, जनक आहुजा, सतीश गंभीर, अमित थापर, जगजितसिंह गंभीर, हरजितसिंह वधवा, किशोर कंत्रोड, बलराम सचदेव, प्रदीप पंजाबी, कन्हैया बालानी, निप्पू धुप्पड, जय भोसले, बबलू खोसला, चिंटू गंभीर, सावन छाब्रा, रामसिंह कथुरिया, रेखा गुलाटी, पूनम खुल्लर, राजू जग्गी, रेखा पावा, अवतार गुरली, निशा हरद्वानी, नगरसेवक महेश लोंढे, नगरसेविका हरप्रीतकौर गंभीर, नगरसेवक मोहित पंजाबी, केवल मल्होत्रा, रविंदर नरंग, राजेंद्र चावला, सतिंदर नारंग, पियुष जग्गी, संजू आहुजा, गिरीश खन्ना आदी उपस्थित होते.
बाबा श्रीचंद महाराज हे श्री गुरु नानक देवजी यांचे ज्येष्ठ सुपुत्र असून, उदासी परंपरेचे संस्थापक म्हणून त्यांचे स्मरण केले जाते. उपलब्ध ऐतिहासिक स्रोतांनुसार त्यांचा जन्म 8 सप्टेंबर 1494 रोजी सुलतानपूर लोधी येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना अध्यात्म, योग, साधना आणि वैराग्याची ओढ होती. पुढे त्यांनी उदासी परंपरेच्या माध्यमातून आध्यात्मिक विचारांचा प्रसार केला. बाबा श्रीचंद महाराजांनी विविध प्रदेशांत भ्रमण करून अध्यात्म, ज्ञान, साधना आणि मानवकल्याणाचा संदेश दिल्याची परंपरा आहे. त्यांच्या परंपरेशी संबंधित अनेक डेरे, आश्रम, गुरुद्वारे आणि धार्मिक केंद्रे पुढे देशाच्या विविध भागांत निर्माण झाली. त्यांच्या जीवनाशी संबंधित बारठ साहिबसह अनेक स्थळांना आजही धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व आहे. अहिल्यानगरमधील अमृतवेला बाबा श्रीचंद महाराज गुरुद्वारा हा या आध्यात्मिक परंपरेचा वारसा जपणारे श्रद्धास्थान म्हणून ओळखला जातो.
यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले की, पुढील पिढी चांगली घडण्यासाठी आणि चांगले विचार पेरण्यासाठी धार्मिक स्थळे प्रेरणास्थळे ठरत आहेत. समाजाने पुढे जाताना आपला इतिहास विसरता कामा नये. शीख आणि पंजाबी समाज हा भारत-पाकिस्तान फाळणीनंतर भारतामध्ये येऊन मोठ्या हिमतीने उभा राहिला. तसेच हा समाज हिंदू संस्कृतीशी एकरूप झाला. आजची पिढी सोशल मीडियामध्ये गुंतलेली आहे. त्यामुळे या पिढीला आपला इतिहास सांगण्याची गरज आहे. धर्मासाठी गुरु गोबिंद सिंह यांच्या सुपुत्रांनी बलिदान दिले. हाच विचार आणि वारसा पुढे घेऊन जायचा असल्याचे आमदार त्यांनी सांगितले.
धनश्री सुजय विखे यांनी बाबा श्रीचंद महाराज गुरुपुरब सोहळ्यानिमित्त उपस्थित भाविकांना शुभेच्छा दिल्या. समाजसेवा आणि सामाजिक कार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल मन्नू खुबचंदानी, रामसिंह कथुरिया, बलराम सचदेव आणि लखू मतलई यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. तसेच गुरुद्वाराच्या वतीने उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी नगरसेवकांचाही सन्मान करण्यात आला.
रविवारी बाबा श्रीचंद महाराजजी यांची आरती करण्यात आली. आरतीनंतर शब्द, आनंद साहेब, अरदास, हुकमनामा आणि गुरू का लंगर या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सोमवारी बाबा श्रीचंद महाराज गुरुपुरब सोहळा साजरा करण्यात आला. सकाळी हजुरी रागी जथा भाई दयासिंहजी यांच्या गुरबाणी कीर्तनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर शब्द, आनंद साहेब, अरदास, हुकमनामा आणि गुरू का लंगराने सोहळ्याची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरजितसिंह वधवा आणि आभार प्रदर्शन सतीश गंभीर यांनी केले. सोहळ्यास समाजबांधव आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

