• Tue. Sep 22nd, 2026

Mirrornews24

Marathi News

अवघ्या पाच मिनिटांत गणितांचा ‘महासंग्राम’; अहिल्यानगरात रंगली राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धा

ByMirror

Sep 22, 2026
वेगवान गणिती कौशल्याने विद्यार्थ्यांनी जिंकली मने

‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन’ विजेत्यांचा दिमाखात गौरव


वेगवान गणिती कौशल्याने विद्यार्थ्यांनी जिंकली मने


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अवघड गणिती प्रक्रिया, वेळेचे आव्हान आणि वेगवान गणना यांचा अनोखा संगम असलेल्या राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपल्या बौद्धिक कौशल्याची प्रभावी झलक दाखविली. एमआयडीसी येथील स्नेहालयात युनिव्हर्सल अबॅकस ॲण्ड वैदिक मॅथ्स असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत विविध जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. अवघ्या पाच मिनिटांच्या राऊंडमध्ये मोठमोठी गणिते अचूकपणे सोडवून विद्यार्थ्यांनी उपस्थितांची वाहवा मिळविली.


पुणे, नवी मुंबई, कल्याण, छत्रपती संभाजीनगर, बीड, शेवगाव, श्रीगोंदा तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध भागांमधून विद्यार्थी स्पर्धेसाठी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांच्या गणिती क्षमतेला चालना देतानाच त्यांच्यातील एकाग्रता, स्मरणशक्ती, गणनावेग आणि आत्मविश्‍वास वाढविण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धेच्या सकाळच्या सत्रात विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली. ज्युनिअर, मास्टर ज्युनिअर, लेव्हल 1 ते 5 आणि वैदिक मॅथ्स अशा विविध गटांमध्ये ही स्पर्धा पार पडली. प्रत्येक गटातील विद्यार्थ्यांसमोर वेळेचे आव्हान होते. अवघ्या पाच मिनिटांच्या राऊंडमध्ये गणिती प्रक्रियेवर आधारित प्रश्‍नपत्रिका सोडवायची होती. वेळ कमी असतानाही विद्यार्थ्यांनी कोणताही दबाव न घेता वेगाने गणिते सोडविली. अनेक विद्यार्थ्यांनी दिलेल्या वेळेपूर्वीच प्रश्‍नपत्रिका पूर्ण केल्याने त्यांच्या गणनावेगाचे आणि सरावाचे उपस्थितांनी कौतुक केले.


स्पर्धेनंतर आयोजित करण्यात आलेल्या पारितोषिक वितरण सोहळ्यास महापालिका महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती दिपालीताई बारस्कर, जिल्हा परिषदेच्या केंद्रप्रमुख मीनाक्षीताई दराडे, मुख्याध्यापिका शीतल गुंदेचा, सामाजिक कार्यकर्त्या ॲड. उज्वला मुरकुटे आणि योगा प्रशिक्षिका शिल्पा बालवे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.
पाहुण्यांचे स्वागत सुनील काळाणे यांनी केले. प्रास्ताविकात हेमलता काळाणे यांनी अबॅकसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला चालना मिळत असल्याचे सांगितले. अबॅकसच्या सरावामुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता, गणनावेग आणि आत्मविश्‍वास वाढण्यास मदत होते. स्पर्धा परीक्षांच्या तयारीतही अबॅकस व वैदिक मॅथ्स उपयुक्त ठरू शकतात, असे त्यांनी नमूद केले.
दिपालीताई बारस्कर म्हणाल्या की, युनिव्हर्सल अबॅकसच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात अबॅकसची चळवळ रुजत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही अबॅकसचे शिक्षण सहज उपलब्ध होत आहे. चांगल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला योग्य दिशा मिळते. युनिव्हर्सल अबॅकसने शिक्षकांची चांगली टीम तयार करून विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. ‘विद्या हे सर्वश्रेष्ठ दान असून, त्याचा लाभ आयुष्यभर मिळतो,’ असेही त्यांनी सांगितले.


मीनाक्षीताई दराडे यांनी स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी गुणवत्तेला महत्त्व असल्याचे सांगितले. अबॅकसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला चालना मिळते. बदलत्या काळात एआयमुळे शिक्षण क्षेत्रात झपाट्याने बदल होत असून, विद्यार्थ्यांनी त्यानुसार स्वतःला विकसित करणे आवश्‍यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अथर्व जाधव (छत्रपती संभाजीनगर), आदित्य कोळगे (शेवगाव), मयंक साळवे (बोल्हेगाव फाटा), स्वरा चिपाडे, अर्णव फुलारी, कियान खत्ती (सारसनगर), इंद्रनील सावंत, आराध्या बुधवंत (गुलमोहर रोड, सावेडी), वेदांत कोथांबीरे, अलोक खेतमालीस (श्रीगोंदा) आणि तन्मय खंडागळे (एमआयडीसी, नागापूर) यांनी ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन’चा मान पटकाविला. सर्व गटांतील प्रथम पाच क्रमांकाच्या विजेत्यांना आकर्षक ट्रॉफी व बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यांसोबतच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.


स्पर्धेचे परीक्षण सविता काकडे, अश्‍विनी शार्दुल, दिपाली अदलींग, मंजुषा फल्ले, सना सय्यद, अश्‍विनी मुंडे, वैशाली तारू आणि राधिका दहातोंडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋग्वेदी काकडे यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी युनिव्हर्सल अबॅकस असोसिएशनचे सुनील काळाणे, बाळासाहेब दहातोंडे, विशाल आढाव, स्वाती घुले, शीतल वाबळे, रुपाली वाजे, स्वप्नाली माळी, प्रिया शेंडगे तसेच असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *