• Tue. Sep 15th, 2026

Mirrornews24

Marathi News

जन शिक्षण संस्थेत क्षमता बांधणी कार्यक्रम उत्साहात

ByMirror

Sep 15, 2026
नोकरीपेक्षा उद्योग-व्यवसायाच्या संधींकडे महिलांनी वळावे -अनिल तांदळे

व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या शिक्षिकांचा सन्मान; महिलांच्या उद्योग-व्यवसायाला चालना देण्यासाठी मार्गदर्शन


नोकरीपेक्षा उद्योग-व्यवसायाच्या संधींकडे महिलांनी वळावे -अनिल तांदळे


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महिला व युवतींना विविध व्यावसायिक कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय (नवी दिल्ली) संचलित जन शिक्षण संस्थेच्या वतीने क्षमता बांधणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील जन शिक्षण संस्थेत झालेल्या या कार्यक्रमात महिला प्रशिक्षिका व शिक्षिकांना विविध व्यावसायिक प्रशिक्षणाबरोबरच मार्केटिंग, बाजारपेठेची उपलब्धता, उद्योग-व्यवसायासाठी आवश्‍यक असलेले बीज भांडवल, शासकीय योजना, कर्ज प्रक्रिया आणि उद्योजकता विकास याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी प्रशिक्षाणार्थी युवती व महिला देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


यावेळी जन शिक्षण संस्थेचे नूतन संचालक अनिल तांदळे, कार्यक्रम अधिकारी सय्यद शफाकत, मनीषा शिंपी, अनुष्का वारे, नीलिमा बल्लाळ, अमर अग्रवाल आदी उपस्थित होते. प्रास्ताविक करताना कार्यक्रम अधिकारी सय्यद शफाकत यांनी जन शिक्षण संस्थेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी सुरू असलेल्या विविध उपक्रम व प्रकल्पांची माहिती दिली.
जन शिक्षण संस्थेचे नूतन संचालक अनिल तांदळे यांनी महिला आज विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत असल्याचे सांगितले. चिकाटी, जिद्द आणि कौशल्याच्या जोरावर महिला उद्योग व व्यवसाय क्षेत्रात स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण करीत आहेत. महिलांसाठी नोकरीपेक्षा उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून मोठ्या संधी निर्माण झाल्या असून, या संधींचा लाभ घेण्यासाठी महिलांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.


युवक-युवतींमध्ये कौशल्याधारित शिक्षणाची रुजवणूक झाली तर सक्षम आणि आत्मनिर्भर भारताची निर्मिती होण्यास मोठी मदत होईल. केवळ पारंपरिक शिक्षणावर अवलंबून न राहता बाजारपेठेची गरज ओळखून कौशल्य आत्मसात करणे आणि त्या कौशल्याचे व्यवसायात रूपांतर करणे ही आजच्या काळाची गरज असल्याचे तांदळे यांनी स्पष्ट केले. जन शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत 40 हजारांपेक्षा अधिक महिला व युवतींना विविध व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे काम करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रक्रियेत महिला प्रशिक्षिकांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण राहिली आहे. महिलांना कौशल्य शिकविण्याबरोबरच त्यांना आत्मविश्‍वास देणे, व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी मार्गदर्शन करणे, असे बहुआयामी कार्य प्रशिक्षिका करीत आहेत. त्यांच्या या योगदानाचा सन्मान म्हणून क्षमता बांधणी कार्यक्रमात त्यांचा सन्मान करण्यात आल्याचे तांदळे यांनी सांगितले.


कार्यक्रमात अमर अग्रवाल यांनी महिला बचत गट, विविध शासकीय योजना, कर्ज प्रक्रिया आणि उद्योजकता विकास या विषयांवर उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. महिलांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करताना कोणत्या बाबींचा विचार करावा, व्यवसायाची निवड कशी करावी, बाजारपेठेची गरज कशी ओळखावी, उपलब्ध साधनसामग्री व भांडवलाचा योग्य वापर कसा करावा, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.


व्यवसाय सुरू करण्यासाठी केवळ आर्थिक भांडवल पुरेसे नसून योग्य नियोजन, बाजारपेठेचा अभ्यास, ग्राहकांची गरज, उत्पादनाची गुणवत्ता, प्रभावी मार्केटिंग आणि सातत्यपूर्ण प्रयत्न या बाबीही तितक्याच महत्त्वाच्या असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. विविध शासकीय योजना व कर्ज सुविधांचा योग्य पद्धतीने लाभ घेऊन महिलांनी स्वयंरोजगाराच्या दिशेने वाटचाल करावी, असे आवाहनही त्यांनी केले. आभार श्रद्धा नेवसे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जन शिक्षण संस्थेच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *