• Sun. Sep 13th, 2026

Mirrornews24

Marathi News

आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सचिन लगड यांचा गौरव

ByMirror

Sep 13, 2026
मुख्याध्यापक सचिन लगड

गुणवत्तावाढीसह विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी सातत्यपूर्ण योगदानाची दखल

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे निरीक्षक तथा यशवंतराव चव्हाण विद्यालय, घारगावचे विद्यमान मुख्याध्यापक सचिन सयाजीराव लगड यांना अहिल्यानगर जिल्हा माध्यमिक शिक्षण विभाग आणि अहिल्यानगर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आदर्श गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ, प्रामाणिक आणि विद्यार्थी केंद्रित कार्याची दखल घेत त्यांचा हा सन्मान करण्यात आला.
सचिन लगड यांनी ९ डिसेंबर १९९१ रोजी ज्ञानदीप ग्रामीण विकास शिक्षण संस्थेच्या श्री. रामेश्वर विद्यालय, चिखली येथून आपल्या शैक्षणिक सेवेला सुरुवात केली. अतिशय दुर्गम व छोट्या गावात विद्यालयाच्या स्थापनेपासून त्याच्या शैक्षणिक विकासात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. प्रतिकूल परिस्थितीतही विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीला प्राधान्य देत त्यांनी शाळेच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न केले.


१९९५ मध्ये विनाअनुदानित कृती समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून नागपूर येथे विनाअनुदानित शाळांतील सेवकांच्या प्रश्नांसाठी आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनात लगड यांनी सक्रिय सहभाग घेतला. या आंदोलनातून विनाअनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी सुमारे ८७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होण्यास मदत झाली. शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांसाठी त्यांनी घेतलेल्या या भूमिकेची दखल संस्थेने घेत त्यांची छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेच्या निरीक्षकपदी नियुक्ती केली.
सध्या यशवंतराव चव्हाण विद्यालय, घारगाव येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असताना लगड यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीवर भर दिला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील दोन विद्यार्थी आयपीएस झाले असून, अनेक विद्यार्थ्यांनी एमपीएससीसह विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविले आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली विद्यालयाने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.


विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून समाज, पालक आणि संस्था यांना सोबत घेत गुणवत्तावाढीचा ध्यास त्यांनी कायम जपला. शिक्षण क्षेत्रातील बदलती आव्हाने स्वीकारत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. केवळ शैक्षणिक कामकाजापुरते मर्यादित न राहता शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांनाही त्यांनी आपुलकीने हाताळले. विविध प्रश्नांचा पाठपुरावा करून संस्था व जिल्हा पातळीवर ते मार्गी लावण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.


त्यामुळे लगड हे केवळ मुख्याध्यापक म्हणून नव्हे, तर मार्गदर्शक शिक्षक, कुशल प्रशासक, सहकाऱ्यांचा आधार आणि जिव्हाळ्याचा सहकारी म्हणून शैक्षणिक क्षेत्रात स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरले आहेत. त्यांच्या प्रामाणिक कार्याची, दूरदृष्टीची, नेतृत्वगुणांची आणि शिक्षणाप्रती असलेल्या निष्ठेची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सचिन लगड हे कोळगाव येथील आबासाहेब लगड (सरदार) यांच्या परिवारातील असून, माजी श्रीगोंदा तालुका पंचायत समिती सभापती सयाजीराव लगड यांचे सुपुत्र आहेत.


त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल संस्थेच्या अध्यक्षा अनुराधाताई राजेंद्र नागवडे, सचिव राजेंद्रदादा शिवाजीराव नागवडे, निरीक्षक बी. के. लगड, तसेच ज्ञानदीप, छत्रपती व तुळजाभवानी संस्थेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि कोळगाव ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *