• Sat. Sep 12th, 2026

Mirrornews24

Marathi News

‘गुन्हा दाखल केल्याने जीवाला धोका’; आरोपींना तातडीने अटक करा

ByMirror

Sep 12, 2026
खरेदी केलेले कपडे बदलीप्रकरणी दुकान मालकाने केली होती मारहाण

खरेदी केलेले कपडे बदलीप्रकरणी दुकान मालकाने केली होती मारहाण
जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर संबंधितांकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा आरोप करत सनी ज्ञानेश्‍वर जगधने (रा. रंगभवन, सर्जेपुरा, अहिल्यानगर) यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (गवर्इ) शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, गुलाम अली शेख, विजय शिरसाठ, नर्इम शेख आदी उपस्थित होते.


जगधने यांनी दिलेल्या निवेदनानुसार, 7 सप्टेंबर 2026 रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील कलम 115 (2), 351 (2), 352 तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील कलम 3(1)(r), 3(1)(s) अन्वये इनाम उल्लाह जिक्रिया खान, अमीर इनाम उल्लाह खान आणि मुतब्बीर इनाम उल्लाह खान यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, घास गल्ली, कापड बाजार, अहिल्यानगर येथे आरोपींचे कपड्यांचे दुकान आहे. 2 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी सुमारे 1.30 वाजता कपडे खरेदी करण्यासाठी ते या दुकानात गेले होते. त्यांनी खरेदी केलेले कपडे बदलण्यासाठी पुन्हा दुकानात गेल्यानंतर संबंधित व्यक्तींनी आपल्याला शिवीगाळ केली तसेच जातीवाचक अपमानास्पद शब्द वापरल्याचा आरोप त्यांनी केला आहे.


या घटनेनंतर जगधने यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात संबंधितांविरुद्ध तक्रार दाखल केली. मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर आपल्याला जीवे मारण्याची भीती निर्माण झाली असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. आपल्या काही हितचिंतकांकडूनही संबंधित व्यक्तींकडून धोका असल्याची माहिती मिळाल्याचा दावा त्यांनी केला आहे. ‘माझ्याविरुद्ध कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्यासाठी संबंधित व्यक्ती जबाबदार राहतील,’ अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित तिघांना तातडीने अटक करावी, तसेच आपल्या जीविताचे संरक्षण करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या प्रकरणी कारवार्इ न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा जगधने यांनी दिला आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *