• Sat. Sep 12th, 2026

Mirrornews24

Marathi News

स्वतःचा निकामी झालेला हात घेऊन चिमुकला पोहोचला जिल्हाधिकारी कार्यालयात

ByMirror

Sep 12, 2026
नऊ वर्षांच्या चिमुकल्याचा हात उपचारानंतर निकामी; पालकांचा डॉक्टरांवर गंभीर आरोप

वैद्यकीय निष्काळजीपणाची चौकशी करून डॉक्टरावर कारवाईची RPI (गवई) ची मागणी


नऊ वर्षांच्या चिमुकल्याचा हात उपचारानंतर निकामी; पालकांचा डॉक्टरांवर गंभीर आरोप


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पाथर्डी तालुक्यातील करंजी-भोसे रोड परिसरातील एका हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर अवघ्या नऊ वर्षांच्या चिमुकल्याच्या उजव्या हातावर कायमस्वरूपी परिणाम झाल्याचा गंभीर आरोप त्याच्या पालकांनी केला आहे. उपचारादरम्यान झालेल्या कथित निष्काळजीपणामुळे मुलाच्या हातातील रक्तवाहिन्यांना इजा होऊन हाताचा पंजा व बोटांची हालचाल प्रभावित झाल्याचा दावा पालकांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई)च्या वतीने करण्यात आली.


विशेष म्हणजे, आपल्या मुलावर झालेल्या अन्यायाची व्यथा प्रशासनासमोर मांडण्यासाठी पालकांनी स्वतःचा हात निकामी झालेल्या नऊ वर्षांच्या मुलालाच जिल्हाधिकारी कार्यालयात आणले. चिमुकल्याची अवस्था पाहून उपस्थितांचेही लक्ष वेधले गेले.
पालकांनी दिलेल्या निवेदनानुसार, 8 ऑगस्ट 2026 रोजी जोहिर गायकवाड हा खेळताना/पडल्याने त्याच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. तपासणी केल्यानंतर हाताचे हाड फ्रॅक्चर झाल्याचे निदान झाले. त्यानंतर संबंधित हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर प्लास्टर करण्यात आले. मात्र, प्लास्टरनंतर मुलाच्या हातात तीव्र वेदना सुरू झाल्या आणि हाताची स्थिती बिघडत गेल्याचे पालकांचे म्हणणे आहे.


मुलाला पुन्हा संबंधित डॉक्टरांकडे नेण्यात आले. त्यावेळी प्लास्टर काढण्यात आले. प्लास्टर काढण्यासाठी बराच वेळ लागला आणि त्यानंतर हातातून रक्तस्राव झाल्याचे पालकांनी निवेदनात म्हटले आहे. हातातील रक्तवाहिन्यांना इजा झाल्यामुळे रक्तपुरवठ्यावर परिणाम झाला आणि त्यानंतर गंभीर संसर्गाची परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
मुलाची प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर त्याला अहिल्यानगर येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने पुढील उपचारासाठी अहिल्यानगर शहरातील एका खासगी रुग्णालयात मुलाला दाखल करण्यात आले. तेथे तपासणी केल्यानंतर आणखी विलंब झाला असता हात कापण्याची वेळ आली असती, अशी माहिती डॉक्टरांनी दिल्याचा दावा पालकांनी केला आहे. त्यानंतर मुलावर शस्त्रक्रिया करण्यात आली. पुढील काळात त्याच्यावर प्लास्टिक सर्जरीही करण्यात आली. उपचार करूनही हातातील नसा व पंजाच्या हालचालींवर कायमस्वरूपी परिणाम झाल्याचे पालकांचे म्हणणे आहे.


‘मुलाच्या हातावर उपचारासाठी आलो; मात्र त्याचे संपूर्ण भविष्यच धोक्यात आले,’ अशी वेदना पालकांनी व्यक्त केली. पुढील काळात मुलाला नियमित थेरपीची आवश्‍यकता असून त्यासाठी मोठा आर्थिक खर्च अपेक्षित असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, संबंधित डॉक्टरांची पात्रता व त्यांनी केलेल्या उपचारांची वैद्यकीयदृष्ट्या चौकशी करण्यात यावी, तसेच उपचारामध्ये वैद्यकीय निष्काळजीपणा झाला आहे का, याची तज्ज्ञ समितीमार्फत तपासणी करावी, अशी मागणी RPI (गवई)च्या पदाधिकाऱ्यांनी केली.


या प्रकरणी संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, तसेच दोष सिद्ध झाल्यास संबंधितांची वैद्यकीय नोंदणी/परवाना याबाबत नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी RPIचे शहर जिल्हा कार्याध्यक्ष दानिश शेख, शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, विजय शिरसाठ, गुलाम अली शेख, प्रतीक बारसे यांच्यासह पीडित मुलाचे पालक उपस्थित होते.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *