शालार्थ आयडीपासून निवडश्रेणी, पोस्ट क्रिएटपर्यंत प्रश्नांचा पाढा; शिक्षकांच्या अडचणींवर दराडेंनी विचारला प्रशासनाला जाब
पंधरा दिवसात प्रश्न न सुटल्यास पुढील बैठक शिक्षण आयुक्त कार्यालयात
‘शालार्थ आयडी, निवडश्रेणी, पोस्ट क्रिएट, अनुकंपा, वेतनश्रेणीसह विविध विषयांवर चर्चा
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी सोमवारी (दि. 7 सप्टेंबर) जिल्हा परिषदेत शिक्षक दरबार घेतला. जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झालेल्या या बैठकीस शिक्षण उपसंचालक गणपत मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी माध्यमिक शिक्षण विभागातील विविध प्रश्नांबाबत शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या अडचणी मांडत प्रशासनाच्या दिरंगाईबद्दल नाराजी व्यक्त केली.
शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करताना आमदार किशोर दराडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रश्न तातडीने निकाली काढण्याच्या सूचना दिल्या. ‘शिक्षकांचे प्रश्न मार्गी लागले पाहिजेत. त्यांना विनाकारण त्रास होता कामा नये,’ अशी स्पष्ट भूमिका घेत त्यांनी प्रशासनाला दिरंगाई न करण्याची तंबी दिली. तर पंधरा दिवसात प्रश्न न सुटल्यास पुढील बैठक शिक्षण आयुक्त कार्यालयात घेण्याचा इशारा संबंधित अधिकाऱ्यांना दराडे यांनी दिला.
या शिक्षक दरबारात माध्यमिक शिक्षण विभागाशी संबंधित अनेक महत्त्वाचे प्रश्न चर्चेत आले. शिक्षक नेते वैभव सांगळे यांनी माध्यमिक विभागात मोठ्या प्रमाणात प्रलंबित असलेल्या फायली, पोस्ट क्रिएट, निवडश्रेणी मान्यता तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शालार्थ आयडीसंदर्भातील प्रश्न आमदार दराडे यांच्या निदर्शनास आणून दिले. या प्रश्नांबाबत आमदार दराडे यांनी शिक्षणाधिकारी यांच्याशी चर्चा करून संबंधित प्रकरणे तातडीने निकाली काढण्याबाबत सूचना केल्या.
या बैठकीस शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड, वेतन अधीक्षक रामदास म्हस्के, लेखा अधिकारी सतीश लहाने यांच्यासह संबंधित अधिकारी तसेच संभाजी पाटील, सुनील पंडित, आप्पासाहेब शिंदे, बाबासाहेब बोडखे, महेंद्र हिंगे, भाऊसाहेब कचरे, दिलीप काटे, शिक्षक नेते वैभव सांगळे, अशोक आव्हाड, सुनील भोर, सचिन झगडे, अमोल ठाणगे, रवींद्र देवडे, राजेंद्र डमाळे, रवींद्र गावडे, तौसीफ शेख, सुधाकर सुंबे, संभाजी थोरात आदींसह जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शालार्थ आयडीमध्ये असलेल्या विविध त्रुटी आणि दुरुस्त्यांचा प्रश्नही बैठकीत ऐरणीवर आला. काही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शालार्थ आयडीशी संबंधित त्रुटी अद्याप दूर न झाल्यामुळे त्यांच्या वेतनावर परिणाम होत असल्याचे उपस्थितांनी सांगितले. आप्पासाहेब शिंदे यांनी शालार्थ आयडीच्या राहिलेल्या त्रुटींमुळे काही शिक्षकांचे वेतन बंद झाल्याचा गंभीर प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाची दखल घेत आमदार दराडे यांनी शिक्षण संचालक पालकर यांच्याशी थेट संपर्क साधून शालार्थ आयडीसंदर्भातील प्रश्न तातडीने मार्गी लावण्याबाबत चर्चा केली. त्यामुळे संबंधित शिक्षकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. यावेळी उपस्थित शिक्षक नेते व शिक्षकांनी देखील विविध प्रश्न उपस्थित केले.
माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे प्रलंबित असलेल्या मुख्याध्यापक, प्राचार्य, पर्यवेक्षक व शिक्षक मान्यतेच्या प्रस्तावांबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. निवडश्रेणीच्या प्रलंबित मान्यतेसाठी आतापर्यंत किती प्रस्ताव प्राप्त झाले, त्यापैकी किती प्रस्तावांना मान्यता देण्यात आली, याची माहिती घेण्याची मागणी करण्यात आली. तसेच विनाअनुदानित शाळेतून अनुदानित शाळेत बदली झालेल्या शिक्षकांच्या मान्यतेसंदर्भातील प्रस्तावांपैकी शिक्षणाधिकारी स्तरावरून पोर्टलद्वारे किती प्रस्ताव पुढे पाठविण्यात आले, याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आला.
कनिष्ठ व वरिष्ठ लिपिक पदांच्या मान्यता प्रस्तावांबाबत असलेली प्रलंबित प्रकरणे, अनुकंपा तत्त्वावरील नियुयांच्या मान्यता, शिफारस करूनही प्रस्तावांमध्ये दाखविण्यात येणाऱ्या त्रुटी याबाबत शिक्षक व कर्मचाऱ्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. डी.एड. वेतनश्रेणीतून बी.एड. वेतनश्रेणीमध्ये वेतोन्नती मिळण्याचा प्रश्नही बैठकीत मांडण्यात आला. संबंधित प्रस्ताव वेळेत दाखल करूनही त्यावर निर्णय होत नसल्यामुळे शिक्षकांच्या वेतनावर परिणाम होत असल्याची बाब उपस्थितांनी निदर्शनास आणून दिली.
पोस्ट क्रिएटचे प्रस्ताव तयार करण्यास व त्यावर निर्णय घेण्यास होणारा विलंब, प्रस्ताव वेळेत दाखल करूनही त्यावर कार्यवाही न होणे आणि त्यामुळे शिक्षकांना वेतन मिळण्यास होणारा विलंब याबाबतही चर्चा करण्यात आली. वेतनेतर अनुदानाचे वितरण, खाजगी अनुदानित शाळांमधील जिल्हाबदल मान्यता, शालेय पोषण आहार यांसह शिक्षण विभागाशी संबंधित विविध प्रश्नांवरही शिक्षकांनी सविस्तर मांडणी केली. बैठकीदरम्यान शिक्षक व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या दैनंदिन कामकाजात येणाऱ्या अडचणी, प्रशासकीय विलंब, आर्थिक अडचणी तसेच विभागीय पातळीवरील त्रुटींचा पाढा वाचला. अनेक प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित राहत असल्याने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी असल्याचे यावेळी दिसून आले.
शिक्षकांच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर आमदार किशोर दराडे यांनी सर्व प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करून ते निकाली काढण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रशासकीय कामांसाठी वारंवार कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत आणि अनावश्यक विलंब होऊ नये, याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. बैठकीच्या शेवटी उपस्थित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रशासनाने संबंधित प्रश्नांवर तातडीने निर्णय घेऊन दीर्घकाळ प्रलंबित असलेली प्रकरणे मार्गी लावावीत, अशी मागणी केली. आमदार दराडे यांचे स्वीय सहाय्यक हरीश मुंडे यांनी या बैठकीचे नियोजन केले होते.

