• Fri. Sep 4th, 2026

Mirrornews24

Marathi News

गणेशाला डीजेचा दणदणाट नको; समाजाला ज्ञानाचा प्रकाश हवा!’

ByMirror

Sep 4, 2026
गणेशाला डीजेचा दणदणाट नको; समाजाला ज्ञानाचा प्रकाश हवा!’

रस्ते-पदपथ अडविणाऱ्या मंडपांनाही विरोध; पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसद करणार ‘लोकमान्य राष्ट्रीय गणेशोत्सव आचारसंहिता 2026’ जाहीर

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- गणेशभक्तीच्या नावाखाली होणारा कर्णकर्कश डीजेचा दणदणाट, प्रचंड क्षमतेच्या ध्वनिवर्धक यंत्रणांचा वापर तसेच संस्कृतीच्या नावाखाली सार्वजनिक रस्ते व पदपथ अडविणाऱ्या मंडपांविरोधात पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसद यांनी जनआंदोलनाची घोषणा केली आहे. गणेशोत्सवाला लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी दिलेल्या लोकजागृती, सामाजिक प्रबोधन आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या मूळ उद्देशाकडे पुन्हा नेण्यासाठी या दोन्ही संघटना लवकरच ‘लोकमान्य राष्ट्रीय गणेशोत्सव आचारसंहिता 2026’ जाहीर करणार आहेत.


या प्रस्तावित जनआचारसंहितेत गणेशोत्सवाच्या काळात डीजे, प्रचंड क्षमतेचे ध्वनिवर्धक तसेच वाहनांवर बसविलेल्या ध्वनिभिंतींना स्पष्टपणे नकार देण्यात येणार आहे. गणेशोत्सव हा भक्ती, सामाजिक प्रबोधन आणि लोकशिक्षणाचा उत्सव असावा; ध्वनीप्रदूषणाची स्पर्धा किंवा शक्तिप्रदर्शनाचे माध्यम होऊ नये, अशी भूमिका संघटनांनी मांडली आहे. सार्वजनिक रस्ते, पदपथ, चौक तसेच रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या मार्गांवर मंडप, कमानी, व्यासपीठे किंवा जनरेटर उभारण्यासही संघटनांकडून विरोध केला जाणार आहे. उत्सवासाठी जागेचा वापर करायचा असल्यास नागरिकांची वाहतूक, आपत्कालीन सेवा आणि पादचाऱ्यांची सुरक्षितता यांना कोणत्याही परिस्थितीत बाधा येऊ नये, अशी मागणी करण्यात येणार आहे.


ध्वनियंत्रणे वापरणे अत्यावश्‍यक असल्यास त्यासाठी लेखी परवानगी, निर्धारित वेळ आणि कायद्याने निश्‍चित केलेल्या ध्वनिमर्यादांचे काटेकोर पालन बंधनकारक करण्यात यावे, अशी मागणीही आचारसंहितेत करण्यात येणार आहे. ‘गणेशभक्ती म्हणजे नागरिकांचे कान फोडणे नव्हे आणि संस्कृती म्हणजे सार्वजनिक रस्त्यांवर मालकी हक्क सांगणे नव्हे,’ अशी स्पष्ट भूमिका पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसद यांनी घेतली आहे.


लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला केवळ धार्मिक उत्सवाचे स्वरूप न देता त्यामागे लोकजागृती, सामाजिक एकात्मता, राष्ट्रीय भावना आणि प्रबोधनाचा व्यापक विचार ठेवला होता. विविध जाती-धर्मांतील नागरिकांना एकत्र आणून समाजात जागृती निर्माण करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाचा उपयोग व्हावा, हा त्यामागील व्यापक दृष्टिकोन होता. मात्र, सध्याच्या काळात अनेक ठिकाणी गणेशोत्सवाचे स्वरूप बदलत असल्याची खंत संघटनांनी व्यक्त केली आहे. ध्वनिस्पर्धा, मोठ्या आवाजातील डीजे, शक्तिप्रदर्शन, राजकीय प्रसिद्धी, वाहतूक कोंडी आणि सार्वजनिक जागांवरील अतिक्रमण यामुळे उत्सवाच्या मूळ उद्देशालाच बाधा येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही विकृती रोखून गणेशोत्सवात लोकभक्ती, ज्ञानभक्ती, कर्मभक्ती, संविधानिक नैतिकता आणि कायद्याचे राज्य यांची पुनर्स्थापना करणे, हा प्रस्तावित आचारसंहितेचा मुख्य उद्देश राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


संघटनांनी आपल्या भूमिकेला सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निर्णयांचा आधार दिला आहे. Noise Pollution (V), In Re, (2005) 5 SCC 733 आणि Church of God v. K.K.R. Majestic Colony, (2000) 7 SCC 282 या प्रकरणांमध्ये शांततापूर्ण जीवनाचा अधिकार हा संविधानाच्या अनुच्छेद 21 शी संबंधित असल्याचे न्यायालयीन भूमिकेतून स्पष्ट झाले आहे, असा दावा संघटनांनी केला आहे.
धर्मस्वातंत्र्य हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार असला तरी त्याच्या नावाखाली अनिच्छुक नागरिकांवर कर्णकर्कश आवाज लादता येणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. तसेच Union of India v. State of Gujarat, (2011) 14 SCC 62 या निर्णयाचा संदर्भ देत सार्वजनिक रस्ते व सार्वजनिक जागांवर अनधिकृत धार्मिक बांधकामांना प्रतिबंध करण्याची जबाबदारी प्रशासनावर असल्याचे संघटनांनी नमूद केले आहे.


‘लोकमान्य राष्ट्रीय गणेशोत्सव आचारसंहिता 2026’ ही सुरुवातीला संविधानातील मूलभूत कर्तव्यांवर आधारित राष्ट्रीय नागरिक सनद आणि आदर्श प्रशासकीय संहिता म्हणून जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर केंद्र व राज्य सरकारे, जिल्हाधिकारी, पोलीस प्रमुख तसेच महानगरपालिका आयुक्तांनी गणेशोत्सवाच्या परवानगीच्या अटींमध्ये या तत्त्वांचा समावेश करावा, अशी मागणी करण्यात येणार आहे.
उत्सवाच्या परवानगीपासून ते प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत ध्वनिप्रदूषण, वाहतूक, सार्वजनिक जागांचा वापर आणि आपत्कालीन मार्गांची उपलब्धता याबाबत स्पष्ट नियम असावेत, अशी संघटनांची अपेक्षा आहे. ही भूमिका कोणत्याही एका धर्माच्या किंवा धार्मिक उत्सवाच्या विरोधात नसल्याचे पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसद यांनी स्पष्ट केले आहे. सर्व धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सवांना समान नियम लागू झाले पाहिजेत, सार्वजनिक जागांचा वापर करताना नागरिकांचे मूलभूत अधिकार आणि कायद्याचे पालन झाले पाहिजे, अशी त्यांची भूमिका आहे.


पीपल्स हेल्पलाईनचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. कारभारी गवळी यांनी या संदर्भात भूमिका स्पष्ट करताना म्हटले की, “गणेशाला डीजेचा दणदणाट नको; समाजाला ज्ञानाचा प्रकाश हवा. रस्ता हा कोणत्याही मंडळाची जहागिरी नसून जनतेच्या मूलभूत प्रवासस्वातंत्र्याचा मार्ग आहे.” लोकमान्यांचा गणेशोत्सव पुन्हा लोकशिक्षणाचा, सामाजिक प्रबोधनाचा आणि संविधाननिष्ठ लोकभक्तीचा उत्सव बनविणे, हीच खरी गणेशसेवा असल्याचे म्हंटले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *