फिनिक्सच्या माध्यमातून 34 वर्षांपासून नेत्रसेवेच्या अखंड कार्याचा गौरव
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सामाजिक कार्यकर्ते तथा ‘नेत्रदूत’ म्हणून ओळख असलेले जालिंदर बोरुडे यांना नेत्रदानाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल साई सूर्य नेत्रसेवेच्या वतीने ‘नेत्र गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या तब्बल 34 वर्षांपासून बोरुडे सातत्याने नेत्रसेवा, मोफत नेत्रशिबिरे, मोतिबिंदू शस्त्रक्रिया तसेच मरणोत्तर नेत्रदानाबाबत जनजागृतीचे कार्य करीत आहेत. त्यांच्या या निस्वार्थ सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमास रोटरी क्लबचे शिरीष रायते, ऑप्थॅल्मोलॉजीचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब बोरुडे, डॉ. राजीव चिट गोपीकर, साई सूर्य नेत्रसेवेचे डॉ. प्रकाश कांकरिया, डॉ. सुधा कांकरिया आदी उपस्थित होते.
जालिंदर बोरुडे यांनी फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील गरजू नागरिकांपर्यंत नेत्रसेवेचा लाभ पोहोचविण्याचे काम केले आहे. आर्थिक परिस्थितीमुळे उपचार घेणे शक्य नसलेल्या अनेक रुग्णांसाठी त्यांनी विविध ठिकाणी नेत्र तपासणी व उपचार शिबिरांचे आयोजन केले. या शिबिरांच्या माध्यमातून गरजू रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांसह गरजू रुग्णांना पुन्हा स्पष्टपणे पाहता आले.
केवळ उपचार आणि शस्त्रक्रियांपुरतेच त्यांचे कार्य मर्यादित राहिले नाही. मरणोत्तर नेत्रदान ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे, हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी सातत्याने जनजागृती केली. नेत्रदानाबाबत असलेले गैरसमज दूर करून नागरिकांना नेत्रदानाचे महत्त्व समजावून सांगण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक नागरिकांनी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला असून, अनेक नेत्रदानाच्या माध्यमातून गरजू व्यक्तींना दृष्टी मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
रोटरी क्लबचे शिरीष रायते म्हणाले, जालिंदर बोरुडे यांच्यासारख्या सेवाव्रती व्यक्ती समाजासाठी प्रेरणादायी असतात. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी कोणत्याही अपेक्षेशिवाय नेत्रसेवेचे कार्य सुरू ठेवले आहे. गरजू रुग्णांच्या डोळ्यांवर उपचार करून त्यांना नवदृष्टी देणे, ही केवळ वैद्यकीय मदत नसून त्यांच्या जीवनाला नवसंजीवनी देण्याचे काम आहे.”
ते पुढे म्हणाले, “फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून बोरुडे यांनी ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत नेत्रसेवा पोहोचविली. अनेक रुग्णांना मोफत उपचार व शस्त्रक्रियेचा लाभ मिळवून दिला. त्याचबरोबर नेत्रदानासारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर समाजात जागृती निर्माण केली. एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर तिचे नेत्रदान झाल्यास त्या माध्यमातून दुसऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात प्रकाश निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नेत्रदानाची चळवळ अधिक व्यापक होणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
साई सूर्य नेत्रसेवेचे डॉ. प्रकाश कांकरिया म्हणाले, डोळ्यांशी संबंधित आजारांवर आधुनिक वैद्यकीय उपचार उपलब्ध असले तरी अनेक नागरिक आर्थिक अडचणी, अज्ञान किंवा वेळेअभावी उपचारांपासून वंचित राहतात. अशा नागरिकांपर्यंत नेत्रसेवा पोहोचविण्यासाठी सामाजिक संस्थांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. बोरुडे यांनी गेल्या 34 वर्षांत सातत्याने नेत्रसेवेचे कार्य केले आहे. विविध भागांत शिबिरे घेऊन गरजू रुग्णांना तपासणी व उपचार उपलब्ध करून देण्याचे त्यांचे काम कौतुकास्पद आहे. नेत्रदानामुळे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात प्रकाश येऊ शकतो, ही भावना समाजमनात रुजविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. सुधा कांकरिया यांनीही जालिंदर बोरुडे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
जालिंदर बोरुडे यांनी फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून तब्बल 34 वर्षांपासून नेत्रसेवेचे कार्य सुरू ठेवले आहे. स्वखर्चाने तसेच विविध सामाजिक संस्था व दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने त्यांनी अनेक ठिकाणी नेत्रतपासणी शिबिरे आयोजित केली. या शिबिरांमध्ये तपासणी झालेल्या गरजू रुग्णांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले. मोतिबिंदू असलेल्या अनेक रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करून त्यांना नवदृष्टी मिळवून देण्यात आली.
नेत्रसेवेबरोबरच अवयवदान आणि नेत्रदान जनजागृती हा त्यांच्या सामाजिक कार्याचा महत्त्वाचा भाग राहिला आहे. मृत्यूनंतरही आपले अवयव व नेत्र गरजूंसाठी उपयोगी पडू शकतात, हा मानवतावादी विचार त्यांनी समाजात रुजविण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून नेत्रदानाबरोबरच अवयवदान जनजागृती आणि विविध सामाजिक उपक्रमही राबविले जात आहेत. समाजातील वंचित, गरजू आणि दुर्बल घटकांना मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य संस्थेच्या माध्यमातून सुरू आहे. या दीर्घकाळाच्या सेवाभावी कार्याची दखल घेऊन साई सूर्य नेत्रसेवेने जालिंदर बोरुडे यांना ‘नेत्र गौरव’ पुरस्काराने गौरविले. पुरस्कार मिळाल्याबद्दल बोरुडे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

