• Fri. Aug 28th, 2026

Mirrornews24

Marathi News

अशोकभाऊ फिरोदिया विद्यालयात ‘हेड बॉय-हेड गर्ल’चा पदग्रहण सोहळा उत्साहात

ByMirror

Aug 28, 2026
एपीआय हेमंत थोरात यांनी विद्यार्थ्यांना दिली शिस्त, नेतृत्व आणि देशसेवेची प्रेरणा

शोल्डर पिन, लॅनयार्ड व नेमप्लेटसह विद्यार्थी प्रतिनिधींनी घेतली शिस्त व जबाबदारीची शपथ


एपीआय हेमंत थोरात यांनी विद्यार्थ्यांना दिली शिस्त, नेतृत्व आणि देशसेवेची प्रेरणा


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी निवडण्यात आलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनी प्रतिनिधी (‘हेड बॉय’ व ‘हेड गर्ल’) यांचा पदग्रहण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या सोहळ्यात नवनिर्वाचित विद्यार्थी प्रतिनिधींनी आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवून शिस्त, नेतृत्व आणि प्रामाणिकपणे कार्य करण्याची शपथ घेतली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया होत्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. संस्थेच्या सल्लागार समितीच्या सदस्या सुनीता मुथा यांच्यासह प्राचार्य प्रभाकर भाबड, उपप्राचार्य कविता सुरतवाला, माध्यमिक विभाग प्रमुख वैशाली वाघ, प्राथमिक विभाग प्रमुख अर्चना मुंडीवाले, पूर्व-प्राथमिक विभाग प्रमुख ज्योती सुद्रिक यांची उपस्थिती होती.


कार्यक्रमाच्या प्रारंभी अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे दिवंगत प्रमुख कार्यवाह स्व. अशोकभाऊ फिरोदिया व शांतीकुमारजी फिरोदिया यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. विद्यालयाच्या संगीत शिक्षिका रेणुका पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. पाहुण्यांचा परिचय प्रिया भळगट यांनी करुन दिला.
शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी हेड बॉय म्हणून संचित बारसे, हेडगर्ल समृद्धी नमन आणि असिस्टंट हेड बॉय अर्चित चोरबेले, असिस्टंट हेडगर्ल सई शेरकर यांची निवड करण्यात आली. विद्यार्थी प्रतिनिधींची निवड प्रक्रिया कोणत्या पद्धतीने पार पडली, याबाबत शिल्पा कमळकर यांनी उपस्थितांना माहिती दिली. निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पदग्रहण सोहळ्यास प्रारंभ झाला. प्रत्येक विद्यार्थी व विद्यार्थिनी प्रतिनिधीचे नाव पुकारून त्यांच्यावर सोपविण्यात आलेल्या पदाची व जबाबदारीची माहिती राशीनकर सर यांनी दिली.


नवनिर्वाचित प्रतिनिधींना पदाची ओळख म्हणून शोल्डर पिन, लॅनयार्ड आणि नेमप्लेट प्रदान करण्यात आली. या क्षणी विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. आपल्या सहकाऱ्यांचे प्रतिनिधित्व करण्याची तसेच विद्यालयाच्या शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये नेतृत्वाची भूमिका बजावण्याची जबाबदारी मिळाल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.
विद्यालयाचे क्रीडाशिक्षक प्रीतम जाधव व दिशान गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली नवनिर्वाचित विद्यार्थी प्रतिनिधींनी पदाची शपथ घेतली. विद्यालयाची शिस्त, प्रतिष्ठा आणि मूल्ये जपत विद्यार्थ्यांसाठी आदर्श निर्माण करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
प्रमुख अतिथी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांना शिस्तीचे महत्त्व समजावून सांगितले. आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. जीवनात यशस्वी होण्यासाठी शिस्त, सातत्य, मेहनत आणि जबाबदारीची भावना आवश्‍यक असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थी जीवनात नेतृत्वाची संधी मिळणे ही भविष्यातील व्यक्तिमत्त्व विकासाची महत्त्वाची पायरी असल्याचेही त्यांनी नमूद केले. देशाच्या प्रगतीसाठी जबाबदार आणि शिस्तप्रिय नागरिक घडण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांनी घ्यावी, असे आवाहन थोरात यांनी केले. शिक्षणासोबतच समाज व देशाप्रती आपली कर्तव्ये ओळखून भविष्यात देशसेवेसाठी स्वतःला समर्पित करण्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.


विद्यार्थी प्रतिनिधींना संस्थेचे सहकार्यवाह गौरव फिरोदिया, उपाध्यक्ष अशोक मुथा व खजिनदार प्रकाश गांधी यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनल शर्मा यांनी केले. आभार अफसर शेख यांनी मानले. या कार्यक्रमात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *