पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन; नागरिकांच्या मनगटावर तिरंगी राखी बांधून संविधाननिष्ठेचा संदेश
नगर-मनमाड महामार्गाला ‘नितीन गडकरी अनागोंदी राष्ट्रीय महामार्ग’ नामकरण
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नागरिकांच्या करातून वेतन घेऊनही जनतेची कामे वर्षानुवर्षे प्रलंबित ठेवणाऱ्या, कायद्याच्या राज्याऐवजी मनमानीला प्राधान्य देणाऱ्या आणि निर्णयांची जबाबदारी टाळणाऱ्या प्रशासकीय प्रवृत्तीविरोधात पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसद यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान अनेक वर्षांपासून रखडलेल्या नगर-मनमाड महामार्गाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी या महामार्गाला प्रतीकात्मक स्वरूपात ‘नितीन गडकरी अनागोंदी (नगर-मनमाड) राष्ट्रीय महामार्ग’ असे नामकरण करण्यात आले.
कर्तव्यनिष्ठा, शिस्त, निर्णयक्षमता आणि लोकाभिमुख प्रशासनाचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या कार्यशैलीचा आदर्श प्रशासनासमोर ठेवत त्यांच्या कर्तव्यनिष्ठेला प्रतीकात्मक ‘तिरंगा राष्ट्रीय धारणालय सलाम’ अर्पण करण्यात आला. प्रशासनातील प्रत्येक पद हे अधिकार गाजविण्याचे सिंहासन नसून जनतेच्या सेवेसाठी असलेले उत्तरदायी साधन आहे, असा संदेश यावेळी देण्यात आला.
आंदोलनादरम्यान नागरिकांच्या मनगटावर तिरंगी राखी बांधून संविधाननिष्ठेचा संदेश देण्यात आला. तसेच ‘चाय पे विकासाची’ आणि धर्मनिरपेक्षतेची चर्चा करत संसदीय लोकशाही अधिक सक्षम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. ‘वंदे मातरम्’ची दोन कडवी गाऊन सर्वसमावेशक राष्ट्रीय भावनेचे पुनर्स्थापन करण्याचे आवाहनही करण्यात आले. यावेळी सौ. मिरा भगवान आव्हाड यांचा अहिल्यानगरच्या ‘अन्नपूर्णा आजी’ म्हणून संघटनेच्या वतीने सन्मान करण्यात आला.
भारतीय प्रशासनातील प्रत्येक अधिकारी भ्रष्ट किंवा अकार्यक्षम नाही. अनेक अधिकारी प्रामाणिकपणे, कर्तव्यभावनेने आणि लोकहिताची जाणीव ठेवून काम करीत आहेत. मात्र, प्रशासनातील विविध स्तरांवरील निर्णयप्रक्रिया, कामकाजाची गती आणि उत्तरदायित्व यांचा एकत्रित परिणाम सामान्य नागरिकांच्या अपेक्षेइतका प्रभावी, पारदर्शक आणि लोकाभिमुख ठरत नसल्याचे संघटनांनी म्हटले. ‘हे आंदोलन भ्रष्टाचार, अनागोंदी, निष्क्रियता आणि जनउत्तरदायित्वशून्य प्रशासकीय वृत्तीविरोधात आहे,’ असे ॲड. कारभारी गवळी यांनी स्पष्ट केले.
सध्याच्या परिस्थितीला दोन प्रमुख प्रवृत्ती कारणीभूत असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. मंत्री, खासदार, आमदार आणि इतर लोकप्रतिनिधींमध्ये दिसून येणारे केंद्राभिमुख भावनिक स्वार्थशासन तसेच लोकहिताची प्रभावी जाणीव आणि नियंत्रण नसताना वापरली जाणारी प्रशासकीय सत्ता यामुळे लोकशाही व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. या दोन्ही प्रवृत्तींवर संविधानिक नैतिकता, कायद्याचे राज्य आणि जागृत विवेकशासनाचे नियंत्रण आवश्यक असल्याचे संघटनांनी नमूद केले. लोकप्रतिनिधी असोत किंवा प्रशासकीय अधिकारीसर्वांनी संविधानाच्या चौकटीत राहून जनतेप्रती उत्तरदायी असले पाहिजे, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.
कर्तव्यनिष्ठा, शिस्त, निर्णयक्षमता आणि लोकाभिमुख प्रशासनाचे उदाहरण म्हणून तुकाराम मुंढे यांच्या कार्यशैलीचा आदर्श जनतेसमोर ठेवण्यात आला. त्यांच्या अनुपस्थितीत प्रतीकात्मक गौरव करून त्यांच्या कर्तव्यनिष्ठेला ‘तिरंगा राष्ट्रीय धारणालय सलाम’ अर्पण करण्यात आला. ‘तिरंगा धारणालय’ या संकल्पनेत केशरी रंग लोकभक्तीचा, पांढरा रंग ज्ञानभक्तीचा आणि हिरवा रंग कर्मभक्तीचा, तर अशोकचक्र संविधानिक नैतिकता व ‘रुल ऑफ लॉ’चे प्रतीक मानले जाते. तिरंगा केवळ शासकीय कार्यालयावर फडकविण्यापुरता मर्यादित न राहता प्रशासनाच्या निर्णयप्रक्रियेत आणि कार्यपद्धतीतही दिसला पाहिजे, असा संदेश आंदोलनातून देण्यात आला.
‘नोकरशाहीला मिळणारी पगारहमी ही निष्क्रियतेची हमी होऊ नये. तुकाराम मुंढे यांच्यासारखी कर्तव्यनिष्ठा अपवाद न राहता भारतीय प्रशासनाचा सार्वत्रिक स्वभाव बनला पाहिजे. तिरंगा केवळ कार्यालयावर फडकवून चालणार नाही; तो अधिकाऱ्यांच्या धारणालयात आणि प्रत्यक्ष कार्यपद्धतीत उतरला पाहिजे,’ असा स्पष्ट संदेश यावेळी देण्यात आला. आंदोलनात ॲड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, ॲड. अमित थोरात, वीर बहादूर प्रजापती, शाहीर कान्हू सुंबे, बाळासाहेब पालवे, हनुमंतराव साळवे, आनंदा आढाव, अभिमान शिंदे, चतुराबाई शिंदे, रमेश भोसले आदी सहभागी झाले होते.

